उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर नुकतीच भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने टीव्ही ९ मराठीने दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांमध्ये होणारं खातेवाटप यावर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. यावेळी अजित पवार यांनी काही महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला असल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातले आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असताना अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना मंत्रिपदं मिळावी यासाठी अग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच अजित पवार यांनीही महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला असल्याने कोणाला कोणती आणि किती खाती द्यायची हा प्रश्न तिन्ही नेत्यांसमोर आहे.
अजित पवार यांच्या गटातील एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अद्याप त्यांच्यापैकी कोणालाच खातं देण्यात आलेलं नाही. चांगली आणि महत्त्वाची खाती मिळावी यासाठी अजित पवार प्रयत्नशील असतील. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी त्यांना आणि त्यांच्या गटातील आमदारांना कोणती मंत्रिपदं मिळायला हवीत, याबाबतचे मुद्दे मांडल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती समजून घ्या, अशा अवस्थेत…”, ‘त्या’ टीकेवर पहिल्यांदाच बोलले देवेंद्र फडणवीस
दरम्यान, अजित पवार यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अर्थ खातं सोडल्याची चर्चा सुरू आहे. ७ जुलै रोजी राज्य सरकारने एक अधिसूचना जारी केली होती ज्यामध्ये अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे आगामी खातेवाटपामध्ये अजित पवार यांना अर्थमंत्रीपद दिली जाऊ शकतं.