विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ८ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना ( शिंदे गट ) खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाष्य केलं आहे.

जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले, “अजित पवारांनी भाजपाबरोबर जात पहाटे शपथ घेतली होती. अजित पवार काहीही करू शकतील, हे त्यांनी कृतीतून दाखवलं आहे. अजित पवार भाजपाबरोबर जात असतील, तर त्यास आमचा विरोध असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासारखा नेता काही आमदारांसह बाहेर पडत असेल, तर आम्ही स्वागत करू,” असंही गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आमच्या…”

“…तर आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही”

अजित पवार भाजपाबरोबर गेल्यास शिवसेनेची भूमिका काय असणार? असा प्रश्न शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांना विचारला. त्यावर शिरसाट म्हणाले, “अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मग, यांना भीती नाही का? फक्त तुम्हालाच भीती वाटतं आहे का? हे सर्व खोटं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही. भाजपाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे,” असे शिरसाटांनी स्पष्ट केलं.

वृत्तपत्रात नेमकं काय म्हटलं?

एका इंग्रजी वृत्तपत्रात सांगितलं की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर, अजित पवारांना भाजपाबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबाही आहे. पण, शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत.”

हेही वाचा : “महायुतीत अजित पवार…”, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य, म्हणाले, “भाजपा आणि आमचं टार्गेट सेट”

“८ एप्रिल रोजी अजित पवारांनी दिल्ली येथे अमित शाहा यांची भेट घेतली होती. दिल्लीला जाण्यासाठी अजित पवारांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही होते. या बैठकीत संभाव्य मंत्रीपदाच्या खातेवाटपाबाबत चर्चा झाली आहे,” असेही वृत्तपत्रात म्हटलं आहे.

Story img Loader