२०१४ मध्ये भाजपाने शिवसेनेची युती केली. त्यानंतर परत त्यांनी युती केली. तेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो. २०१९ भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यांनी चर्चेचीही तयारी दर्शवली नाही. त्यामुळे भाजपासह सरकार स्थापन करण्याचा प्रश्न आला नाही कारण ते सरकार बनवण्याच्याच तयारीत नव्हते. उदय सामंत जे सांगत आहेत खोटं आहे. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. उदय सामंत यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या आमचं सरकार आलं तर ते आमच्या दारात असतील पण आम्ही त्यांना सत्तेत घेणार नाही. एकनाथ शिंदेंना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं तर आज त्यांची भूमिका वेगळी असती. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अजित पवार आणि राष्ट्रवादीने विरोध केला
एकनाथ शिंदेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काम करत आहेत. अजित पवारांपासून वळसे पाटील यांच्यासह सगळे काम करत नाहीत. आमच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन करताना या सगळ्यांचा एकच हेका होता की आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही. या गोष्टीचे पुरावे आहेत. वारंवार राष्ट्रवादीचा एकच हेका आणि ठेका होता. कुणाला विधीमंडळाचा नेता करता आहात ते पाहा आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही.
अजित पवारांनी मला लिफ्टमध्ये भेटून सांगितलं..
एकनाथ शिंदेंच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून विरोध करणाऱ्यांमध्ये त्यावेळी अजित पवार होते, जयंत पाटील, सुनील तटकरे या सगळ्यांचं हेच म्हणणं होतं. ताज लँड्स मधल्या एका बैठकीत लिफ्टमधून उतरत असताना अजित पवारांनी सांगितलं होतं की मी एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही. आता हे आम्हाला काय सांगत आहेत? असं संजय राऊत म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंची निवड सर्वसंमतीने झाली होती
उद्धव ठाकरेंची निवड मुख्यमंत्री म्हणून कशी झाली यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून सर्वसंमती होती. एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा विरोध भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सगळ्यांना मान्य होतं म्हणून ते मुख्यमंत्री झाले.” असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.