अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. पण, मंत्रीपद न मिळल्याने आमच्याबरोबर ते आले नाहीत, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर माजी मंत्री, अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. पण, मी शरद पवारांना सोडून येणार नसल्याचं सांगितलं, असं देशमुखांनी म्हटलं.
अजित पवार काय म्हणाले?
“अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे,’ असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, ‘आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही. मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं, ‘मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही.’ ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “बारामती लोकसभेची जागा लढवणारच,” अजित पवारांचा निर्धार, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
“मला प्रफुल्ल पटेलांची फोन आले होते”
यावर अनिल देशमुख म्हणाले, “मला प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती. शपथविधीवेळी मी पुण्यात होतो. मला प्रफुल्ल पटेलांची फोन आले होते. पण, मी शरद पवारांना सोडून येणार नसल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं.”
हेही वाचा : “जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना प्रदेशाध्यक्षपदाचा शब्द दिला होता, पण…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट
“८३ वर्षाच्या बापाला एकटं सोडू नका”
“मी, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी बैठकांमध्ये अजित पवार गटाला असा निर्णय घेऊ नका, असं बोललो होतो. मी चारवेळा त्यांच्या बैठकीला गेलो होतो. शरद पवार ८३ वर्षाचे आहेत. ८३ वर्षाच्या बापाला एकटं सोडू नका,” असंही सांगितल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलं.