बारामतीमध्ये बहुप्रतिक्षित असलेला महा रोजगार मेळावा आज संपन्न होत आहे. शरद पवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या मैदानात हा कार्यक्रम होत असताना स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवार यांनाच निमंत्रण न दिल्यामुळे हा कार्यक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली. त्यावर शरद पवार यांचे नावच नसल्याचे दिसले. तरीही आम्ही कार्यक्रमाला जाणार असल्याची घोषणा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली होती. तसेच शरद पवार यांनी पत्र लिहून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरी जेवणाचे निमंत्रण दिले. आज प्रत्यक्ष कार्यक्रम संपन्न होत असताना अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले.
मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे स्वागत करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज मंचावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येताच, सुप्रिया सुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे सरसावल्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे हात जोडून स्वागत केले. पण तेवढ्या शिंदे यांच्या मागे असलेल्या अजित पवार यांनी जनतेकडे हात दाखवून अभिवादन करण्यास सुरुवात केली आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरसावल्या. त्यांचेही सुळे यांनी स्वागत केले. याहीवेळेस अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी नजरा-नजर करणे टाळले.
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
सुप्रिया सुळे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशीही बातचीत केली. यावेळी त्यांच्याशेजारीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. मात्र दोघींनीही मंचावर एकमेकांशी बोलणे टाळले.
दरम्यान शरद पवारेदेखील मंचावर येत असताना त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी नजरा-नजर करण्याचे टाळले. शरद पवार मंचावर आले आणि तडक आपल्या जागेवर जाऊन बसले. सुप्रिया सुळे यांनी मात्र दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचा नामोल्लेख केला. यावेळी ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव घेणार का? याकडे श्रोत्यांचे लक्ष लागले होते. राज्यातील मंत्र्यांची नावे घेतल्यानंतर अजित पवार यांनी ‘आदरणीय पवार साहेब, सुप्रिया सुळे’ एवढाच नामोल्लेख केला. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा खासदार म्हणून उल्लेख केला नाही. तसेच शरद पवार यांचेही पूर्ण नाव घेतले नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा यथोचित उल्लेख केला.
बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्यावरून वाद सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पवार यांना निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून मेळाव्याची सुधारित निमंत्रणपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली.