Ajit Pawar on Pune Crime Rate Rises : पुण्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. “जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, असं अजित पवार पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाचा बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. “पुण्यात गुन्हेगारी वाढली असं म्हणणं चुकीचं ठरेल” असं फडणवीस म्हणाले. पुण्यात अलीकडच्या काळात खून, दरोडे, खंडणी, हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत. अनेक गुन्हेगारी टोळ्या या शहरात सक्रीय आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून अजित पवारांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “कुठंतरी पोलीस प्रशासन कमी पडतंय असं माझं मत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांनी तसं सांगितल्यानंतर आम्ही इतर चांगल्या अधिकाऱ्यांची तिथं नेमणूक करू. महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीबद्दल मोठी चर्चा होत आहे आणि हे आपण सर्वजण पाहत आहोत”.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांचा बचाव
दरम्यान, अजित पवारांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पुण्याचा व्याप आणि विस्तार पाहिला तर पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतेय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. अर्थात एक जरी गुन्हेगारी घटना घडली तरी ती गांभीर्यानेच घेतली पाहिजे. अशा घटना घडत आहेत आणि त्यावर आमचं लक्ष आहे. पोलीस अशा सर्व घटनांमध्ये तात्काळ आरोपींना पकडत आहेत. त्यांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पुण्याच्या सुरक्षिततेला गांभीर्याने घेत शहरातील सीसीटीव्ही नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम आमच्या सरकारने हाती घेतलं आहे”.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”
पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
पुण्यातील विमाननगर येथील डब्ल्यूएनएस आयटी कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या एका इसमाने त्याच्या मैत्रिणीवर धारदार चाकूने वार करून तिचा खून केला. ही घटना सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. अशा अनेक घटना अलीकडच्या काळात पुण्यात घडल्या आहेत. यावरून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.