राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवार) राज्याच्या चार महिन्यांच्या खर्चासाठी लेखानुदान सादर केले. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची लागलेली चाहूल या लेखानुदानात पहावयास मिळाली. गेल्या दहा वर्षात राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे पवारांनी यावेळी नमूद केले. राज्यातील सर्वांसाठी वीज दरात २० टक्क्यांनी कपात करण्याच्या महत्वपूर्ण घोषणेबरोबरच, मदरसा आधुनिकीकरण – विज्ञान,गणित शिक्षण, अल्पसंख्याक विद्यार्थी योजनेसाठी ८१ कोटी, अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रासाठी ४० कोटी, घरकूल योजनेसाठी ३३३ कोटी, रोजगार हमी योजनेसाठी २५० कोटींची भरघोस तरतूद करत सरकारने मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध वर्गांना खुश करण्यासाठी आधीच तिजोरीवर मोठय़ा प्रमाणावर बोजा पडला आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सवलतींची खैरात करण्याची सत्ताधाऱ्यांची योजना या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
लेखानुदानातील ठळक मुद्दे;
- सर्वांसाठी वीज दरात २० टक्क्यांनी कपात.
- जीवनावश्यक वस्तूंवरील व्हॅटची सवलत कायम.
- सवलतींच्या दरात धान्य उपलब्ध होणार.
- घरकूल योजनेसाठी ३३३ कोटी रूपयांची तरतूद.
- रोजगार हमी योजनेसाठी २५० कोटींची तरतूद.
- मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी १३६ कोटींची तरतूद.
- जलसंपदा विभाग प्रकल्पांसाठी ८२१५ कोटी रूपयांची तरतूद.
- मदरसा आधुनिकीकरण – विज्ञान,गणित शिक्षण, अल्पसंख्याक विद्यार्थी योजनेसाठी ८१ कोटी, अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रासाठी ४० कोटी.
- २०१८ पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे चार टप्पे पूर्ण करणार.
- कराड, अमरावती, जळगाव आणि सोलापूरला नवीन विमानतळं होणार.
- तंत्र शिक्षणासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद.
- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद.
- राज्यात पोलिसांची ६१,४९४ नवीन पदं निर्माण करणार.
- अन्न सुरक्षेचा राज्यातील ७ कोटी जनतेला लाभ.