Ajit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या, मात्र, असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे.
अजित पवार आणि शरद पवार २०२३ पासून वेगळे झाले
२०२३ मध्ये शरद पवारांना सोडून अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये जाणं पसंत केलं. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ४१ आमदारही सत्तेत गेले. २०२३ पासून अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष राज्याला दिसला. जून २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. अजित पवारांनी महायुतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे होत्या. प्रत्यक्षात ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती. लोकसभेला सुप्रिया सुळे निवडून आल्या. तसंच शरद पवारांच्या पक्षानेही उत्तम कामगिरी केली. तर विधानसभेला याच्या विरुद्ध चित्र दिसलं. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला ४१ जागा मिळाल्या. तर महायुतीला २३७ जागा मिळाल्या. यानंतर अजित पवारांच्या पक्षाने शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना बरोबर येण्याची ऑफर दिल्याच्या चर्चा होत्या. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा- Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
आमदार रोहित पवार या चर्चांबाबत काय म्हणाले होते?
आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे. “संसदेचं अधिवेशन सुरु होतं, तेव्हा सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. पण आमचे खासदार असा कोणताही निर्णय घेतील असं आपल्याला वाटत नाही”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही. निलेश लंके, अमर काळे यांच्यासह तीन-चार जणांनी सांगितलं की सुनील तटकरे यांच्यासह कुणीही आम्हाला संपर्क केलेला नाही. मग या चर्चा का घडवता? असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी कुणालाही कुठलीही ऑफर दिलेली नाही हे स्पष्ट केलं. एक खासदार हा २० ते २२ लाख मतदारांचं प्रतिनिधीत्व करतो. चार जणांनी तरी हे सांगितलं आहे की त्यांना कुणीही संपर्क केला नाही. असं अजित पवार म्हणाले. राज्यात येत्या काही महिन्यांत २९ महानगर पालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे.