Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखले जातात. आज अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत की एकनाथ शिंदे या प्रश्नाचं क्षणार्धात उत्तर दिलं आहे. तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही भाष्य केलं.

काय म्हणाले अजित पवार?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण सरकार म्हणून एसआयटी नेमली आहे, त्याचप्रमाणे सीआयडी नेमली आहे. या सगळ्या चौकशीत धनंजय मुंडे यांचं नाव कुठेही आलेलं नाही. संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं ते व्हायरल फोटो पाहून आम्हालाही वेदना झाल्या. त्यानंतर आम्ही सगळे बसलो, त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असं अजित पवार यांनी सांगितलं. या प्रकरणात आम्ही कुणालाही पाठिशी घालणार नाही, कोणतंही चुकीचं कृत्य खपवून घेणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले माझं काम स्ट्रेट फॉरवर्ड

माझं काम स्ट्रेट फॉरवर्ड असतं. बीड असो किंवा पुणे असो चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करणार होणारच असंही अजित पवार म्हणाले. कायद्याचे पालन सगळ्यांनी करावं अशी माझी भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी काम केलं. विधानसभा, विधानपरिषदेवर काम केलं आहे. त्यांनी राज्यसभेवर जावं असं मला वाटत होतं. छगन भुजबळांना नाराज करण्याचा माझा किंवा पक्षाचा हेतू नव्हता असेही अजित पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. या मुलाखतीत या मुद्द्यांवर भाष्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत की एकनाथ शिंदे या प्रश्नावरही अजित पवारांनी त्वरित उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस जवळचे की एकनाथ शिंदे?

देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत की एकनाथ शिंदे? असा प्रश्न अजित पवारांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवारांनी क्षणार्धात देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तेच जवळचे. मी सध्या कुणालाच नाराज करणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने तर मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले आहेत असंही अजित पवार म्हणाले. तर सर्वात उत्तम मुख्यमंत्री आपल्याला विलासराव देशमुख वाटतात त्यांनी उत्तम कारभार केला असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

Story img Loader