विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. वर्षभरापूर्वी ३९ आमदारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. परंतु विधान परिषदेत ठाकरे गट हा भारतीय जनता पार्टीनंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष होता. ठाकरे गटाकडे १० आमदार होते. त्यामुळे टाकरे गटाकडे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद होतं. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एक आमदार होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार होते. दरम्यान, कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ९ आमदार आहेत.

सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे आहे. परंतु मनीषा कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झालं आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला की, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का? यावर अजित पवार स्मितहास्य करत म्हणाले, तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू.

अजित पवार म्हणाले, आमची राष्ट्रवादीची बैठक आधीच ठरली आहे. जयंत पाटील आणि मी फार आधीच ती ठरवली आहे. या बैठकीचा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कसलाही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही ९ जूनला जी सभा घेणार होतो, ती पावसामुळे घेता आली नाही. ती निमंत्रितांची सभा २१ जूनला आयोजित केली आहे. स्वतः पवारसाहेबांनी ती सभा ठेवली आहे.

निश्चितपणे यावर विचार करू : अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आमची महाविकास आघाडी आहे. लगेच तुम्ही काहीतरी बातम्या चालवू नका. विधानसभा, विधान परिषदेत ज्या वेळेस विरोधी पक्षनेतेपद देण्याची वेळ येते त्यावेळी ज्यांच्या सर्वाधिक जागा त्यांना ते विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. २०१४ च्या निवडणुकीनंतर आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) ४१ आमदार होतो, काँग्रेसचे ४२ आमदार होते. तेव्हा शेतकरी काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य होते, ज्यांना आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. आमची आघाडी होती. म्हणजेच आमच्याकडे ४४ आमदार होते. तरीदेखील ५ वर्ष ते पद काँग्रेसकडे होतं.

हे ही वाचा >> मनिषा कायंदेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “४० कोटींची फाईल…”

अजित पवार म्हणाले, त्यावेळचे (२०१४) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांचा आमदार मी विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करणार. तुम्ही (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) सांगताय त्याबद्दल आम्ही कोणताही विचार केलेला नाही. परंतु तुम्ही हे लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar answer on will ncp claim leader of the opposition in legislative council asc
Show comments