राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाला अनेकांकडून कडाडून विरोध सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी चव्हाण म्हणाले, राज्य सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरावे चालत नाहीत, परंतु निजामाचे पुरावे चालतात.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी काही वेळापूर्वी कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी अजित पवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणावं, तुम्हीसुद्धा एकेकाळी चार वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होता, राज्याचे प्रमुख होता. टीका करणं फार सोपं असतं. हे जे कोणी टीका करत आहेत, ते कधी ना कधी राज्यात प्रमुख होते आणि आत्ता जे सत्तेवर आहेत ते आहेतच. यातून कोणीच सुटणार नाही.
अजित पवार म्हणाले, माझं स्पष्ट मत आहे की अशी एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालणार नाही. आपल्याला समंजस भूमिका घ्यावी लागेल. सरकारमध्ये असणारे आणि विरोधात असणाऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी. काहीजण म्हणतात केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे, अरे मग त्याआधी १० वर्ष मनमोहन सिंह सत्तेवर होते. १० वर्ष यूपीए सरकार होतं ना? त्यामुळे कोणी कोणावर दोषारोप करू नये. सर्वांनीच समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी. यामध्ये राजकारण आणू नये.
हे ही वाच >> “उद्धव ठाकरेंच्या जळगावातील सभेनं चार टकल्यांच्या मनात धडकी भरलीय”, संजय राऊतांचा रोख कोणाकडे?
अजित पवार म्हणाले, फक्त मीच चांगला आणि बाकीचे दोषी किंवा हा प्रश्न सोडवण्यात ते कमी पडत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न कोणीच करू नये. आज काहीजण पुढारलेपण करत आहेत, तिथे (अंतरवाली सराटी गावात, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी) जाऊन विरोधी पक्षनेते म्हणून भेटत आहेत किंवा दिखावा करत आहेत. त्यांच्यापैकी सगळेच जण वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर काम करत होते. त्यांना जेव्हा कोणी त्रयस्थाने विचारलं की तुम्ही जेव्हा त्या प्रमुख पदावर होता तेव्हा हा प्रश्न का सोडवला नाही. याचं त्यांच्याकडे काय उत्तर आहे? स्वतः पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतून आले होते ना?