Ajit Pawar : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. यातच आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर तब्बल दोन तास शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संबंधितांवर कडक करवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच “राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : Ajit Pawar : “…तर अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, चक्की पिसायला लावणार”, बदलापूर घटनेवरून अजित पवारांचा इशारा

अजित पवार काय म्हणाले?

“दोन तीन दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा वाऱ्यामुळे कोसळला. मात्र, यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या सर्वांच्या चौकशा केल्या जातील. आता काही बातम्या येत आहेत की हे त्यांनी केलं किंवा यांनी केलं. आता कोणी काय केलं? याचा सर्व तपास लागला पाहिजे. यामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो. मी याबाबत महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे दैवत आहेत. मात्र, त्यांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे हे सर्वांना धक्का बसणारे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते कोणीही असूद्या. वरिष्ठ अधिकारी असुद्या किंवा कंत्राटदार असुद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली?

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये, ही माझी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद घटना आहे. अशा घटनांची योग्य चौकशी करून कोण दोषी आहेत, हे समोर आले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याठिकाणी पुन्हा भव्य असा पुतळा उभारला गेला पाहिजे. आम्ही या तीनही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. या समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल यावर उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई होईल.”

Story img Loader