काँग्रेसने नीलेश राणे यांना आवर घालावा. आघाडीत अद्याप जागावाटपाची चर्चा झालेली नाही. अशा वेळी कोणती जागा कोण लढवणार याबाबत बोलणे योग्य नाही. आघाडीला चांगले यश मिळवायचे असेल तर टोकाची भूमिका घेणे योग्य नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा नीलेश राणे यांनी केली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांची मने दुखावतात. त्यामुळे अशी विधाने करताना विचार करणे आवश्यक असते, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात कोणतीही तडजोड अद्याप तरी आम्ही मान्य केली नसून १४४ जागांच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीसाठी जागावाटपात जागांचे फेरबदल होऊ शकतात. दोन्हींपकी ज्या पक्षाने एखादी जागा तीन वेळा लढवूनही पराभव झाला असेल तर तेथे वेगळा विचार करावा, अशी आमची भूमिका आहे. मात्र याबाबतचा निर्णय दोन्ही बाजूंनी मान्य झाला तरच घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अद्याप सुटलेला नसून तो सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मधल्या काळात यासंदर्भात घडलेल्या घटनांची राज्य सरकारने तसेच सुप्रीम कोर्टानेही दखल घेतली आहे. आम्ही सीमावासी मराठी बांधवांच्या पाठीशी ठाम आहोत, असे त्यांनी एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.
अन्यथा राज्य सरकार करणार महामार्गाची दुरुस्ती
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आजच्या आढावा बठकीत चर्चा झाली. त्या वेळी येत्या २० ऑगस्टपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे. तोपर्यंत दुरुस्ती झाली नाही तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्याची दुरुस्ती करून त्याचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करेल असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा