राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांनी त्यांच्या एका निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच, इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलं. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी भाषणाच्या शेवटी शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला. त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळी भावनिक झाले. अनेक मोठ्या नेत्यांना अश्रूही अनावर झाले. यावेळी पक्षातले सर्वच नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत असताना अजित पवारांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
शरद पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अश्रू अनावर झाले. सगळ्यांनी घोषणाबाजी केली. जयंत पाटील यांनी तर शरद पवारांनी निर्णय मागे घेतला नाही तर आपणही राजीनामा देऊ, असं जाहीर केलं. त्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनीही अशाच प्रकारची भूमिका घेतली असताना अजित पवारांनी मात्र शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. तसेच, रडणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत असताना त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचाही संदर्भ दिला.
“शरद पवार अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही असं नाही”
“सगळ्यांच्या भावना शरद पवारांनी ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. तुम्ही गैरसमज करून घेताय. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असं नाहीये. आज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खर्गे, पण काँग्रेस चालतीये सोनिया गांधींकडे बधून. त्यामुळे शरद पवारांच्या आत्ताच्या वयाचा विचार करता सगळ्यांशी चर्चा करून एका नव्या नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहातोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम करेल”, असं अजित पवार यावेळी म्हणले.
“शरद पवार म्हणजेच पक्ष आहे”
“शरद पवारांनी परवाच सांगितलं की भाकरी फिरवायची असते. त्यांनी निर्णय घेतलाय. मी काकींशी (प्रतिभा पवार) बोललो तेव्हा त्यांनीही मला सांगितलंय की त्यांनी आता निर्णय घेतला आहे. आज तरी ते त्यावर ठाम आहेत. ही त्यांची भूमिका आहे. तुम्ही लगेच असं म्हणू नका की आम्हाला दुसरा पर्याय नाही वगैरे. ते आहेतच. आपल्याला दुसरा कुणाचा पर्याय आहे? साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या अध्यक्षाला आपण साथ देऊ. त्याच्या पाठिशी उभे राहू. तो नवनव्या गोष्टी शिकत जाईल”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.
“तुम्ही थांबलात तर आम्हीही थांबू”, शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर
“आपण घरात वय झाल्यानंतर नव्या लोकांना संधी देत असतो, शिकवत असतो तशा सगळ्या गोष्टी होतीलच. तुम्ही कशाला काळजी करताय? साहेबांच्याच जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे हे सांगायला कुठल्या किडमिड्या ज्योतिषाची गरज नाही. एक मात्र खरंय की हा निर्णय घेताना त्यांनी कुणालाही विश्वासात घेतलं नाही. आपण पुस्तकाच्या प्रकाशनाला आलो होतो. आता त्यांनी एकदम हा निर्णय सांगितला. हा एक प्रकारचा धक्का आहे. लोकांना वाटलं इतर कुठल्या गोष्टीची भाकरी फिरवायची. शरद पवार या परिवाराचेच भाग आहेत, याबाबत तिळमात्र शंका मनात बाळगू नका”, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.
VIDEO: राजकीय आयुष्याबाबत शरद पवारांची मोठी घोषणा; म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…”
काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात – अजित पवार
“काळानुरूप काही निर्णय़ घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांदेखत नवीन झालेला अध्यक्ष तुम्हाला का नको आहे? मला कळत नाही तुमचं. उद्या साहेबांनी जेव्हा आपल्याला हाक दिली, तेव्हा आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत. त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचे निर्णय होणार आहेत. कुणीही भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. तेच कालच जाहीर करणार होते. पण काल वज्रमूठ सभा होती. सगळं मीडियात तेच चाललं असतं. त्यामुळे दोन तारीख ठरली. त्यामुळे आज त्यांनी तो निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मनात जे आहे, त्या गोष्टी आपण करू. त्याबाहेर कुणीही काहीही करणार नाही”, असंही अजित पवार म्हणाले.