Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत. आपल्या बीडमधील भाषणात त्यांनी युवकांना उद्देशून अनेक मोलाचे सल्ले दिले. बोलताना भान बाळगा हे सांगत असतानाच पुढाऱ्यांच्या पाया पडायचं असेल तर त्याची हिस्ट्री आठवा असाही सल्ला दिला. तसंच माझ्या पाया पडायला येऊ नका, हार, टोप्या, मानचिन्ह काही देऊ नका, चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललं आहे असंही म्हणाले. अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेतलं नाही पण त्यांचा उल्लेख केला.
काय म्हणाले अजित पवार?
आपल्याला पुढे जायचं असेल तर सर्वधर्म समभाव जपला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सगळ्या समाजांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. विशिष्ट समाजाचेच लोक महाराजांच्या दरबारी होते असं काहीजण सांगतात त्याला काही अर्थ नाही. महाराजांच्या दरबारी अल्पसंख्याक समाजातलेही लोक होते. एका धार्मिक स्थळाजवळ जिलेटिन उडवण्यात आलं ही विकृती आहे असं अजित पवार म्हणाले.
सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने करा-अजित पवार
अनेकदा सोशल मीडियाचाही वापर चांगल्या पद्धतीने होत नाही. What’s App वरुन काहीतरी मेसेज करायचे. चुकीचं काहीतरी पाठवायचं. आमचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार पदावर बसले आहेत. त्यामुळे आता मला कोण काय बोलणार आहे? या गैरसमजात राहू नका. मेसेज डिलिट केला तरीही सगळे मेसेज मिळतात. अशा गोष्टी केल्या आणि अडकलात तर मी सोडवायला येणार नाही. काही लोकांना तर मी मकोका लावायला सांगितला आहे. मी कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही हे लक्षात ठेवा असाही इशारा अजित पवारांनी दिला.
राख गोळा करणाऱ्या गँगसह सगळ्या गँगना सुतासारखं सरळ करणार
राख गोळा करणारी गँग, वाळू तस्करीची गँग, भूखंड गँग या सगळ्या गँगना सुतासारखं सरळ करणार, कुणाच्याही दबावाला तुम्ही घाबरु नका. आज मी महसूल खात्याच्या सचिवालाही आणलं आहे. मी सगळी यंत्रणा व्यवस्थित राबवतो, तुम्हाला कळेल कामाचा वेग वाढला आहे. रस्ता नुसता मंजूर करुन जो बिलं काढेल त्याला नाही मातीत घातला तर बोला. असंही अजित पवार म्हणाले.
चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललं आहे-अजित पवार
शाली आणू नका, टोप्या घालू नका, हार घालू नका नमस्कार करा तेवढं बरं वाटेल. जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. याने काहीतरी केलंय त्यामुळे हाराचा बोजा आहे आता आमच्यावर. आई-बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललं आहे आमचं. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा तुम्हीच म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, आई-बापांच्या पाया पडा, गुरुंच्या पाया पडा, पुढाऱ्यांच्या पाया पडू नका. असंही अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले. गुरु जो आपल्याला शिकवतो त्यांच्या पाया पडा. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील ही आभाळाएवढी माणसं होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आई जिजाऊ, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, अण्णा भाऊ साठे अशा किती जणांची नावं घेऊ त्यांच्यापुढे नतमस्तक व्हा. उगीचच पाया पडणं लाचारी पत्करल्यासारखं वाटतं असं मी तरुणांना सांगतो, राम राम किंवा नमस्कार करा की. सलाम वालेकुम म्हणा काय हरकत आहे? सगळ्या धर्मांचा आदर केला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.