मतदारसंघ – सांगली/सातारा
सातारा-सांगली हा मतदारसंघ खरे तर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पण आकडेवारीतील हे प्रभुत्व पक्षातील अंतर्गत अस्वस्थेपुढे सपशेल पराभूत झाले आणि धक्कादायक निकालाची नोंद झाली. ही निवडणूक मोहनराव कदम आणि शेखर गोरे यांच्यात झाली असली तरी ती प्रत्यक्षात लढली गेली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये. राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढतीत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फूट पडल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधानपरिषद हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना काँग्रेसचे मोहनराव कदम यांनी दणदणीत विजय मिळविला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग्रहाने उमेदवारी दिलेले शेखर गोरे यांना तब्बल ६३ मतांनी पराभूत करून काँग्रेसने राष्ट्रवादीला अनेक प्रश्नांच्या गुंत्यात अडकवले आहे. ‘रासप’मधून आलेल्या गोरेंना उमेदवारी देत पवार यांनी पक्षावर वर्चस्व मिळविण्याचा चालवलेला प्रयत्न त्यांच्यावरच उलटला आहे. मतदारसंघात पक्षाकडे तब्बल १३१ अधिकची मते असताना असा लाजिरवाणा पराभव होतो, तिथेच या पक्षात सारे काही आलबेल नाही हे या निवडणुकीतून पुढे आले आहे. यामध्ये आता संशयाची सुई आमदार जयंत पाटील, उदयनराजे भोसले तसेच अन्य नेत्यांकडे वळणार हे निश्चित.
हाती मतांचे बळ असतानाही फाजील आत्मविश्वासात वावरलेली राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षाचे नेते आणि मतांचे अंकगणित अनुकूल नसतानाही सुरुवातीपासून नियोजनबद्धरीत्या पावले टाकलेली काँग्रेस हे या निवडणुकीचे सार आहे. सोनसळच्या कदम कुटुंबात गेली अनेक वर्षे सत्तेचा असमतोल राहिला होता. गेली चार दशके राजकारणात सक्रिय असतानाही मोहनराव कदम यांना जिल्ह्य़ाच्या बाहेर येण्यास एक प्रकारे ‘लक्ष्मण रेषा’ आखून देण्यात आली होती. डॉ. पतंगराव कदम राज्यात तर मोहनराव जिल्ह्य़ात हे सूत्र ठरले होते. ही रेष ओलांडण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी मोठी कामगिरी करत त्यांची उमेदवारी एकमुखाने पक्की केली.
सांगली व सातारा जिल्हा परिषदा, दोन्ही जिल्ह्य़ातील नगरपालिका, सांगली महापालिका आणि पंचायत समितीमध्ये संख्याबळ अधिक असूनही राष्ट्रवादीला मतदान कमी कसे झाले, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी अजितदादांवरील राग बाहेर काढण्यासाठी या संधीचा फायदाच घेतल्याची चर्चा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जातीय कार्डचाही वापर केला गेला. कदम हे मराठा, तर गोरे हे माळी जातीतील असल्याने या निवडणुकीला जातीयतेचे वळणही लागल्याचे जाणकार सांगत आहेत. आजवर जे ‘मराठा कार्ड’ राष्ट्रवादी काँग्रेसने सर्रासपणे वापरले तेच या निवडणुकीत त्यांच्यावर उलटल्याची चर्चा आहे.
सांगली व सातारा जिल्हा परिषदा, दोन्ही जिल्ह्य़ातील नगरपालिका, सांगली महापालिका आणि पंचायत समितीमध्ये संख्याबळ अधिक असूनही राष्ट्रवादीला मतदान कमी कसे झाले, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.