Ajit Pawar On Sharad Pawar : राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असून प्रचाराच्या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच प्रचारांसाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्याही सभा विविध मतदारसंघात पार पडत आहेत. तसेच सर्वच पक्षांकडून जनतेला मोठी आश्वासनेही देण्यात येत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे. युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार आहेत. खरं तर बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढत मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. सध्या अजित पवार आणि युगेंद्र पवार दोन्हीही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र, असं असतानाच एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “काहींना वाटत असेल की मी साहेबांना सोडायला नको होतं. पण मी साहेबांना (शरद पवार यांना) सोडलेलं नाही”, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“तुम्हाला काहींना वाटत असेल की मी (अजित पवार) साहेबांना (शरद पवार) सोडायला नको होतं. मित्रांनो मी साहेबांना सोडलेलं नाही. मी साहेबांना सांगत होतो की सर्व आमदारांचं मत होतं. माझ्या एकट्याचं मत नव्हतं. सर्व आमदारांच्या सह्या आहेत. सर्वांचं मत होतं की सरकारमध्ये जावं. आता सरकारमध्ये का जावं? तर कामाला स्थगिती आली होती. आज या ठिकाणी बसलेल्यांपैकी संभाजी आणि राजवर्धन यांना विचारा. आपण मंजूर केलेल्या कामांना स्थगिती आली होती. तेव्हा म्हटलं हे तर तापच झाला. लोक मला तर वेढ्यात काढतील कारण पैसे पाठवले आणि स्थगिती दिली. आता ती स्थगिती मी नव्हती दिली. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. स्थगिती सरकारने दिली होती”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.