Ajit Pawar on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल (दि. ९ नोव्हेंबर) शिराळा येथे जाहीर सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे, असे विधान अमित शाह यांनी केले होते. या विधानाचे आता राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. महायुतीने एकनाथ शिंदेंनाच पुन्ह मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला आहे, असे एकाबाजूला सांगितले जाते. तर महायुतीचे नेते निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होईल, असे सांगत आहेत. त्यातच अमित शाह यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्यामुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह नेमके काय म्हणाले होते?
“मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे किंवा त्यांनी ठरविले आहे” असे विधान अमित शाह यांनी केले होते.
मोदींकडूनही फडणवीस यांचे कौतुक
अमित शाह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांचे कौतुक केले. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्याची फडणवीस यांची इच्छा महायुती सरकार सत्तेवर आल्यावर मी पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथील प्रचारसभेत सांगितले. फडणवीस यांची इच्छा, असा उल्लेख पंतप्रधानांनी केल्याने राजकीय वर्तुळात त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे.
अजित पवार काय म्हणाले?
पिंपरीमधील मेळाव्यात अमित शाह यांच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले, अमित शाह यांना सांगण्याचा अधिकार आहे. शेवटी निवडणूक झाल्यानंतर सर्व आमदार एकत्र येतील. समन्वयाने चर्चा करतील. यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचे किंवा गैरसमज करून घेण्याचे काहीच कारण नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, अमित शाह हे महायुतीचे केंद्रीय नेते आहेत. भाजपाचेही नेते आहेत. महायुती सत्तेत आणणे हे आमचे आज लक्ष्य आहे. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाबरोबर बसूनच याचा निर्णय होईल.
हे वाचा >> मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चढओढ
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्यास मुख्यमंत्री कोण होणार, यावरून भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांमध्ये चढाओढ आहे. शिंदे यांनी अडीच वर्षांत चांगली कामगिरी करून दाखविल्याने त्यांनाच पुन्हा ही जबाबदारी मिळावी, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. तशीच कृती अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस फोडून करून दाखविली आहे. त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे. तर फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी पक्षासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.