गेल्या जवळपास वर्षभरापासून पवार कुटुंबात पडलेल्या फुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी ४० आमदार व काही खासदारांसमवेत शरद पवारांची साथ सोडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालामुळे त्यांना या दोन्ही गोष्टी मिळाल्या. मात्र, अजूनही शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यात पक्षीय पातळीवर व कौटुंबिक पातळीवरही टीका-टिप्पणी होताना दिसत आहे. प्रचारादरम्यान ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे. अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांनी यासंदर्भात बोलताना अजित पवारांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राजेंद्र पवार?
रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अजित पवारांवर टीका केली. “आमच्या कुटुंबात अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शरद पवार हेच फक्त राजकारणात आहेत. बाकी आम्हा इतरांचा समाजजीवनात जास्त संबंध आहे. त्यामुळे आम्हाला ज्यांचे विचार योग्य वाटतात, ज्यांनी राजकारणातून बारामतीचं नाव देशात पोहोचवलं ते शरद पवार आमचे प्रमुख आहेत. त्यांची विचारधारा आम्हा सर्वांना पटली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत”, असं राजेंद्र पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा केली असता त्यावर राजेंद्र पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता सगळे कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेत, माझ्यावेळी प्रचाराला का नाही आले? अशी टीका अजित पवारांनी केल्याचं राजेंद्र पवारांना सांगताच त्यांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतलं.
“त्यांनी कुत्र्यांच्या छत्र्यांची उपमा का दिली माहिती नाही. मी परदेशातून आल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार छत्रपती कारखान्याला उभे राहिले. त्यांच्यासोबत मी घरोघरी प्रचार केला. टी. एन. शेषन यांच्या काळात जेव्हा निवडणूक खर्चावर मर्यादा आल्या, तेव्हा सायकलवर घरोघरी प्रचार करून आम्ही अर्धा तालुका फिरलो. त्यातले अनेक कार्यकर्ते आजही काही त्यांच्याबरोबर आणि काही आमच्याबरोबर आहेत. आम्ही कायम त्यांच्यासाठी प्रचार करत राहिलो”, असा दावा राजेंद्र पवारांनी केला.
“फक्त गेल्या निवडणुकीत…”
“फक्त गेल्या निवडणुकीत रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये उभा होता. त्याला जास्त गरज होती म्हणून आम्ही तिकडे प्रचाराला गेलो. मला वाटतं त्यांना हे सगळं जाणीवपूर्वक विसरायचं होतं. आम्ही त्यांचं काम करत होतो हे ते जाणीवपूर्वक विसरले आहेत”, असंही राजेंद्र पवार म्हणाले.
“माझे सगळ्यात थोरले चुलते वसंत पवार यांची विचारधारा शेकाप पक्षाची होती. त्यांनी आमराईच्या परिसरात गोरगरीबांना कायद्यासंदर्भात मदत केली. अशा अनेक लोकांना आम्ही मदत केली. याचा उपयोग शरद पवारांना १९६७ साली झाला. नंतर शरद पवारांचा उपयोग अजित पवार, सुप्रिया सुळेंना झालाय”, असं ते म्हणाले.
“आमच्यात एक पद्धत आहे की एकानं एका वेळी राजकारणात राहावं. शरद पवार राजकारणात असताना आप्पासाहेब त्यांना पाठिंबा देत राहिले, पण राजकारणात डोकावले नाहीत. त्यामुळे संघर्ष झाल्याचं कुठे दिसत नाही. अजित पवार राजकारणात आले तेव्हा शरद पवार त्यांच्या पाठिशी उभे राहिले. बारामतीच्या स्थानिक राजकारणात शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंनी लक्ष दिलं नाही. आम्हीही आमचं काम करत राहिलो. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की हे फक्त ते आणि त्यांचंच आहे. असं नसतं”, अशा शब्दांत राजेंद्र पवारांनी अजित पवारांवर टीकास्र सोडलं.