पवार कुटुंबाची दिवाळी म्हणजे गोविंदबागेतली दिवाळी. गोविंदबाग हे शरद पवारांचं बारामतीतलं निवासस्थान. शरद पवार या कुटुंबाचे प्रमुख. राष्ट्रवादीत जी उभी फूट पडली त्यानंतर अजित पवार या दिवाळीला येणार की नाही? याच्या चर्चा दिवसभर रंगल्या होत्या. खरंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सकाळपासूनच गोविंदबाग या ठिकाणी होत्या. मात्र अजित पवार मिसिंग होते. असं असलं तरीही अजित पवार यांनी रात्री पाडव्याच्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली. सुप्रिया सुळेंनी हा फोटोही पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे सुप्रिया सुळेंनी दुपारी पोस्ट केलेल्या फोटोत?

सुप्रिया सुळेंनी पाडव्याच्या दिवशी दुपारी पवार कुटुंबाचे फोटो पोस्ट केले होते. त्यामध्ये सुनेत्रा पवार (अजित पवारांच्या पत्नी) दिसल्या होत्या. मात्र अजित पवार मिसिंग होते. त्यामुळे अजित पवार आता पाडव्याच्या कार्यक्रमाला येणार नाहीत असेच अंदाज वर्तवले जात होते. कारण राष्ट्रवादीत जी उभी फूट पडली त्यानंतर पवार कुटुंबाची ही पहिलीच दिवाळी होती. या दिवाळीत अजित पवार हे शरद पवारांना गोविंदबागेत भेटणार नाहीत अशीच चर्चा रंगली होती. कारण सकाळपासूनच शरद पवारांना भेटण्यासाठी लोकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची गोविंदबागेत गर्दी झाली होती. शरद पवारांच्या कुटुंबातले जवळपास सगळे सदस्य गोविंदबागेत आले. मात्र अजित पवार आले नव्हते. त्यामुळे अजित पवार हे आता गोविंदबागेत येणार नाहीत हे जवळपास निश्चित झालं होतं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते कुठल्याही कार्यक्रमांना गेले नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे दादा (अजित पवार) इथे आला नसेल असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं होतं. मात्र रात्री अजित पवार हे गोविंदबागेत आले. पाडवा त्यांनी पवार कुटुंबासह साजरा केला हे सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या फोटोंवरुनच स्पष्ट झालं आहे.

गोविंदबागेत अजित पवार शरद पवारांच्या पाठिशी

सुप्रिया सुळेंनी पाडव्याच्या संध्याकाळचे जे फोटो पोस्ट केले त्या फोटोंमध्ये अजित पवार हे शरद पवारांच्या पाठिशी उभे आहेत असंच दिसून येतं आहे. अजित पवार हे उशिरा शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पोहचले. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. शनिवारी त्यांनी जेव्हा शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर दिल्लीवारी करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. मात्र पाडव्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ते गोविंदबागेत आले नाहीत याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन अजित पवारांनी आपली दिवाळी पवार कुटुंबासह साजरी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar came to sharad pawar house govindbaug for padwa and diwali he stands behind sharad pawar in family photo supriya sule posts photo scj
Show comments