राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. राष्ट्रवादीतील ४० आमदारांसह अजित पवार भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं.
सत्तांतराच्या चर्चेवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चत आले आहेत. अजित पवारांनी नुकतंच ‘सकाळ’ वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी प्रबळ इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली.
अजित पवारांच्या या विधानानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक विधान केलं आहे. अजित पवार बहुमताच्या बाजुने आले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं विधान रावसाहेब दानवेंनी केलं आहे. ते जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “जे वाजपेयी-अडवाणींना जमलं नाही, ते मोदींनी करून दाखवलं”, अजित पवारांकडून PM मोदींचं कौतुक
अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेबाबत विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले, “ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तरीही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही. या राजकारणातल्या घटना आहेत. मुख्यमंत्री पदावर दावा सांगणं, ही वेगळी गोष्ट आहे आणि बहुमत असणं, ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे अजित पवार बहुमताच्या बाजुने आले किंवा कदाचित १०-२० वर्षांनी त्यांना बहुमत मिळालं, तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. माझा त्यांना विरोध नाही. ते चांगले कार्यकर्ते आहेत. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे-जे वक्तव्यं करतात, त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.”