राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडून दोन गट पडले आहेत. पक्षातील ४१ आमदार अजित पवारांच्या गटात आहेत तर १३ आमदार शरद पवार गटात आहेत. तसेच पक्षाचे चार खासदार शरद पवार गटात आणि एक खासदार अजित पवार गटात आहे. शरद पवार गटातील खासदार आपल्या गटात यावेत यासाठी अजित पवारांचे प्रयत्न चालू असल्याचं बोललं जातं. प्रामुख्याने शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत बरीच चर्चा झाली. परंतु, अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे की, ते शरद पवार गटातच आहेत आणि राहतील. त्यानंतर अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात राजकीय संघर्ष चालू झाला आहे. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून शिरूरची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, महायुतीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याने अजित पवार यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणी चालू केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते शिवाजीराव अढळराव पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. शिवाजीराव अजित पवार गटात सामील झाल्यास त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. दरम्यान, अजित पवार शिरूरमध्ये दुसऱ्या उमेदवाराबात चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात म्हणजेच शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) मोर्चेबांधणी चालू केली आहे. याअंतर्गत त्यांनी मतदासंघात आज (४ मार्च) सभा घेतली.
शिरूरच्या सभेत अजित पवार म्हणाले, अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा निवडणुकीला उभे राहतात, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा उभे राहतात, यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम? अमिताभ बच्चनदेखील निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. नंतर त्यांना वाटलं, हे राजकारण आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. सगळं सोडून दिलं. शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं. एखादा नवीन माणूस आला तर सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला बरं वाटतं. दिसायला चांगला… मिशांना पिळ दिला… राजबिंडा गडी पाहिला की आपण त्याला मत देतो. त्यांना उमेदवारी देऊन, प्रचार करून त्यात आमच्याही चुका झाल्या आहेत. आम्हाला काही लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा (खासदार अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही.
हे ही वाचा >> “मविआबाबत आम्ही संभ्रमावस्थेत”, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्यात मतभेद…”
अजित पवार म्हणाले, नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या (१९ फेब्रुवारी) दिवशी ते (खासदार अमोल कोल्हे) मला भेटले. मी त्यांना विचारलं, का हो डॉक्टर.. तुम्ही मागे म्हणाला होता की तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे. मग आता तुम्ही परत दंड थोपटले? तर मला म्हणाले, ‘दादा जरा वाटायला लागलंय की आपण परत उभं राहावं.’ पण असं कसं चालेल? मुळात आपल्या मतदारसंघातील प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्यासमोर महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत.