शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. तसेच त्यांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार आणि शरद पवार गटातील नेते अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे पदयात्रा काढणार आहेत. याबाबत अजित पवारांना विचारल्यावर त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. तसेच पुढच्या निवडणुकीत कोल्हेंविरोधात उमेदवार देऊन त्या उमेदवाराला निवडून आणू असं आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, “निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांनी (अमोल कोल्हे) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना पदयात्रा सूचत आहे”. अजित पवारांच्या आव्हानावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, “१०० टक्के मी निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल.” तसेच अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलं आहे.

अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, अमोल कोल्हेंना जे वाटलं ते वक्तव्य त्यांनी केलं. मला वाटलं ते मी बोललो. तीच गोष्ट किती वेळा उगळणार. अमोल कोल्हे यांनी आव्हान स्वीकारलं असेल तर आता तुम्ही बघाच. हा अजित पवार एखादं चॅलेंज (आव्हान) देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेलच.

अजित पवार रविवारी म्हणाले होते, “शिरूरच्या खासदाराने पाच वर्षे त्याच्या मतदारसंघात लक्ष घातलं असतं तर खूप चांगलं झालं असतं.” त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. अमोल कोल्हे म्हणाले, “काही चुकलं असेल तर अजित पवार यांनी त्याच वेळी माझा कान धरला असता तर बरं झालं असतं.” यावर परत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, त्यांना उमेदवारी मी दिली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं होतं. मधल्या काळात त्यांच्या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या एकाही विधानसभा मतदारसंघात ते फिरकले नाहीत. पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे.

“अमोल कोल्हे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती”

अजित पवार म्हणाले, खासदार झाल्यावर दीड वर्षात त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. ते म्हणाले होते, ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे काही सांगणार नव्हतो. पण, आता निवडणुका आल्यानंतर त्यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar challenge will defeat amol kolhe in the upcoming shirur lok sabha elections asc
Show comments