राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच दोन गटांमध्ये चालू असलेल्या कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा चालू आहे. अजित पवार यांच्या नेतृ्त्वाखाली एक गट सरकारमध्ये सहभागी झाला असून एक गट अजूनही शरद पवारांसोबत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन्ही गटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अजित पवार गटाच्या बैठकीत नेतेमंडळींनी शरद पवारांना व त्यांच्या धोरणांना लक्ष्य करताना आपापल्या भूमिका मांडल्या. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
“राष्ट्रीय पक्षाची मान्यता परत मिळवायचीये”
“आपली राष्ट्रीयत्वाची मान्यता रद्द झालीये. ती आपल्याला परत मिळवायची आहे. हे सगळं मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीने केलं आहे. २०२४ला होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा ७१ चा सर्वाधिक आकडा २००४ चा आहे, तो कुठल्याही परिस्थितीत पुढे घेऊन जाऊ. २०२४च्या निवडणुकीत जवळपास ९० जागा आपण लढवणार आहोत. महाराष्ट्र पिंजून काढू. माझी अजूनही माझ्या दैवताला विनंती आहे. आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजूनही आमच्या पांडुरंगानं आम्हाला आशीर्वाद द्यावा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांचं शरद पवारांना थेट आव्हान!
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे. शरद पवारांनी राज्यभर दौरा करून ठिकठिकाणी सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावरून अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.
“खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही”, अजित पवारांनी सांगितला ‘तो’ घटनाक्रम!
“आम्हाला सांगितलं जातं की आता सभा सुरू होणार आहेत. पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये होणार. अरे काय दिलीप वळसे पाटलांनी चूक केलीये? मतदारसंघ बांधलाय. मलाही थोडं बोलता येतं. भाषण करता येतं. लोक मला ऐकतात. उद्या जर त्यांनी दौरा सुरू केला, तर मलाही ७ दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल. मला उत्तर द्यावं लागेल. मी जर गप्प बसलो, तर जनता म्हणेल याच्यात खोट आहे. पण मित्रांनो, माझ्यात खोट नाहीये”, अशा शब्दांत अजित पवारांनी थेट आव्हान दिलं आहे.
“ते आमदाराला म्हणाले, कसा निवडून येतो ते बघतो”
“एका आमदाराला वरिष्ठांनी समजावून सांगितलं. तो म्हणाला नाही, मला आता नाही थांबायचंय. आमदारकी नाही मिळाली तरी चालेल. शेवटी वरिष्ठांनी शब्द वापरला तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे तुमची मुलं ना ती? तुम्हाला साथ दिली. ही भाषा दैवतानं करायची? शेवटी तो आमदार म्हणाला, मला नको आमदारकी. मी घरी बसतो”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
“वय आता ८२ झालं, ८३ झालं तरीही…” अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या निवृत्तीचाच मुद्दा केला उपस्थित
“..तर मला वस्तुस्थिती सांगावी लागेल”
“माझी आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की त्यांनी थोडा आराम करावा. एवढा हट्टीपणा करू नये. मी आज थोडंच बोललोय. पण उद्या जर सभा व्हायला लागल्या, तर मला लोकांना वस्तुस्थिती सांगावी लागेल. ती वेळ कोणत्याही घरात येउ नये. मी सगळ्यांचा आजही आदर करतो. उद्याही करत राहीन. पण कुठेतरी वरिष्ठांनी थांबलं पाहिजे. वरीष्ठांनी आशीर्वाद दिले पाहिजेत. चुकलं तर कानाला धरून सांगा चुकलं म्हणून. समजून घेईन”, असं अजित पवारांनी आपल्या भाषणात नमूद केलं.