राष्ट्रवादीत नाराज असलेल्या अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. आज त्यांनी राजभवनात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री बनल्याने महाराष्ट्रातील जनतेला धक्का बसला आहे. दरम्यान, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच आपल्या ट्वीटर बायोमध्ये बदल केला आहे.
हेही वाचा >> Ajit Pawar New Deputy CM : “मी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची…”, अजित पवारांनी घेतली शपथ
अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर बायोमध्ये बदल केला आहे. “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामती येथून विधानसभेचे सदस्य, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते”, असा बदल त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे नेते असलेले, राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अचानक आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला की राष्ट्रवादीत राहूनच आमदारांना फोडलं? याबाबत शंका निर्माण झाली होती. परंतु, त्यांनी अद्यापही राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. ते अजूनही राष्ट्रवादीत असल्याचंच त्यांच्या ट्वीटर बायोवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीची पुढची रणनीती काय असणार याबाबत थोड्याच वेळात खुलासा होणार आहे.