गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत स्वत: अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलं आहे. जिवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असं अजित पवारांनी म्हटलं. तरीही अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चा अद्याप थांबताना दिसत नाहीत.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांवर टीकास्र सोडलं आहे. अजित पवारांनी दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फसवलं आहे, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपाची कुणीही फसवणूक करू शकत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं. ते अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “…तरच अजित पवार भाजपाबरोबर जाऊ शकतील”, विधानसभा उपाध्यक्षांचं थेट विधान!
“अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीची दोनदा फसवणूक केली” या प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवारांच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर काय बोलले? यावर मी कशाला वक्तव्य करू… याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं. पण भाजपाची कुणीही फसवणूक करू शकत नाही.”
दरम्यान, फडणवीसांनी जयंत पाटलांच्या विधानाचाही समाचार घेतला. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असेल. भाजपाने देवेंद्र फडणवीसांना फौजदारावरून हवालदार केलं, या जयंत पाटलांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता फडणवीस म्हणाले, “जयंत पाटलांनी कुणाला काय म्हटलं? हे मला माहीत नाही. पण अशाप्रकारचं स्वप्न त्यांनी २०१४ आणि २०१९ ला पाहिलं होतं. पण त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रव्यापी पक्षच नाही.”