विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपावर टीका केली आहे. सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वितरण झालेले नाही. आर्थिक वर्ष संपत आले. त्यामुळे हा निधी परत जणार आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. तसेच मागील चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवालही अजित पवार यांनी केला आहे.

सरकारकडून निधीचे वितरण करण्यात आलेले नाही

“विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाहीये. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे,” असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

आमदार, मंत्र्यांच्या मतदारसंघांत कोट्यवधींची कामे

“ग्रामीण भागातील विकासासाठी दिला जाणारा निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे खर्चाअभावी हा निधी परत जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. मात्र तिजोरीचा विचार न करता, केवळ मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या मतदाररसंघात कोट्यवधींची कामे जाहीर करण्यात आली. मात्र तेवढा निधी सरकारकडे नाही. ही लोकांची फसवणूक आहे,” अशी टीका अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.

चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का?

“विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का?” असा खोचक सवाल पवार यांनी केला.

Story img Loader