राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असूनही त्यांनी ऐनवेळी आपला अर्जच दाखल केला नाही. तर मूळचे काँग्रेसचे नेते असलेले सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. परिणामी काँग्रेस तसेच बाळासाहेब थोरात चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याच मुद्द्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतंय, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते, असे अजित पवार म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >> तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”
“दोन दिवसांपासून काहीतरी वेगळेच कानावर येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. काहीतरी वेगळं शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा >> “फडणवीसांनी संकेत दिले होते, पण..,” शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीवर शिवसेनेचे महत्त्वाचे भाष्य
नेमकं काय घडलं?
नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला होता. या जागेवर काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज दाखल करावयाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा ए बी फॉर्म असूनही डॉ. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. या जागेवर सत्यजित तांबे यांचा विजय झाला तरी ते अपक्षच आमदार असतील. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीआधीच ही जागा गमावली आहे. याच कारणामुळे महाविकास आघाडीसाठी हा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >> अशोक चव्हाणांनी पंकजा मुंडेंना दिला मोलाचा सल्ला, नाराजीच्या चर्चेवर बोलताना म्हणाले “कोणत्या घोड्यावर…”
सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार?
दरम्यान, सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीतील बेबनाव समोर आला आहे. सत्यजित तांबे यांनी भाजपाने मला पाठिंबा द्यावा, अशी माझी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी विचारणा केल्यास आम्ही विचार करू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं कोणतं राजकीय समीकरण पाहायला मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.