Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेचा तिढा ११ दिवसांनी सुटला आहे. भाजपाने विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर महायुतीच्या तीनही नेत्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना सत्तास्थापनेसंदर्भात पत्र दिले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविले. त्यानंतर महायुतीच्या तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापन करण्याबाबतची माहिती दिली. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत चर्चेचे मोहोळ उठले होते, त्यावर भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले की, मी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. पण वृत्तवाहिन्यांनी वेगळीच बातमी चालवली. अजित पवारांना आज भेट नाकारली. उद्या भेट नाकारली, अशा बातम्या चालवल्या. पण मी त्यांना भेटायला गेलोच नव्हतो. “मी एक खुलासा करू इच्छितो. मी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मी कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. मी अमित शाह यांना भेटायलाच गेलो नव्हतो, तर त्यांनी भेट नाकारायचा प्रश्नच येत नाही. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्या आहेत. खासदार म्हणून ११ जनपथ हा बंगला त्यांना देण्यात आला आहे. त्या बंगल्यामध्ये काय बदल करता येतील, हे बघण्यासाठी आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

हे वाचा >> Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल; ‘या’ बहिणींचे पैसे बंद होणार?

याबरोबरच सर्वोच्च न्यायालयात आमच्या काही केसेस सुरू आहेत. या सर्व खटल्यांचे काम प्रफुल पटेल पाहत होते. मी वकिलांना कधी भेटलो नव्हतो. त्यामुळे आमच्या खटल्यांचे काम पाहणाऱ्या वकिलांबरोबर भेट घेतली. घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आमचे प्रकरण आहे. तसेच एका जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. अशा तीन गोष्टींसाठी प्रामुख्याने मी दिल्लीला गेलो होतो, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.

हे ही वाचा >> शहांसाठी ताटकळणारे अजित पवार हिरमसून अखेर मुंबईला रवाना; भेट मागितलीच नव्हती, अजितदादांचा दावा

मी तर उद्याच शपथ घेणार…

दरम्यान महायुतीच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या मिश्किल विधानाने चांगलाच हशा पिकला. एकनाथ शिंदे हे कधी शपथ घेणार? असा प्रश्न पत्रकार विचारत होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, बाकीच्या कुणाचे माहीत नाही. पण मी तर उद्याच शपथ घेणार आहे.

अजित पवारांच्या विधानानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही हजरजबाबीपणा दाखवत चिमटा काढला. ते म्हणाले, अजित पवारांना सकाळी, दुपारी, संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे. या हास्यकल्लोळात अजित पवार यांनी पुन्हा एक विधान केले. ते म्हणाले, मागच्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घेतलेली शपथ दोन दिवस टिकली. मात्र यावेळी आम्ही एकत्र पाच वर्ष काम करून दाखवू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar clarification on delhi tour and so called meeting with amit shah at maharashtra government formation press conf kvg