जुलै महिन्यात अजित पवार ९ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर अन्य आमदारांनीही अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला. तेव्हापासून सरकारमधील शिंदे गट आणि अजित पवार गटात धुसफूस असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांना गणशोत्सवापासून सुरूवात झाली. वेगवेगळ्या दिग्गजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगला वर्षा निवासस्थानी हजेरी लावली. पण, संपूर्ण गणेशोत्सवात अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर गेले नाहीत. तसेच, ३ ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलाही अजित पवार यांनी हजेरी लावली नव्हती. यामुळे अजित पवार नाराज असल्याचं सांगितलं जात होतं.
हेही वाचा : निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह गोठवणार? कायदेतज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…
पण, या चर्चांवर अजित पवार यांनी मौन सोडलं आहे. ते नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अजित पवार म्हणाले, “मी नाराज असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला गेलो नाही, अशा बातम्या चालवण्यात आल्या. आरे बाबा तब्येत ठिक नव्हती, कुठं मंत्रिमंडळ बैठकीला जाता.”
हेही वाचा : “संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत, कारण…”, देवेंद्र फडणवीसांची टीका
“ओबीसी बैठकीतही माझ्यात आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली, अशा बातम्या चालवल्या. आरे कशाची खडाजंगी… ही बातमी आल्यानंतर मी भुजबळांना फोन केला आणि विचारलं, ‘कधी आपल्यात खडाजंगी झाली?’… म्हणजे काहीही चालू आहे. पण, लोकांना बातम्या वाचून खरे वाटते. हे तीन पक्षांचं सरकार आहे. घर चालवत असताना कारभाऱ्याला अडचणी येत असतात. येथे वेगवेगळ्या विचारधारा आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.