राज्यातील करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशीही राज्यात तब्बल ८ हजाराहून जास्त करोनाबाधित आढळले आहेत. त्यातले ५ हजार एकट्या मुंबईत आहेत. राज्य सरकारने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही कठोर निर्बंध टाकले असून कार्यक्रमांना उपस्थिती लावणाऱ्यांची संख्या मर्यादित केली आहे. मात्र, आता नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्र अजित पवारांनी बोलून दाखवला आहे. मात्र, रोजची रुग्णसंख्या आणि वाढीचा दर लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील, असे सूतोवाच अजित पवारांनी दिले आहेत.
कोरेगाव भिमा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी करोनाच्या स्थितीविषयी विचारणा केली असता अजित पवारांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
..तरच त्यातून मार्ग काढणं शक्य!
“नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक झाली. साधारण दररोजचा आकडा लक्षात घेऊन किती पटीत रुग्णांची संख्या वाढतेय, ते बघून त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. पण रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली, तर नाईलाजाने अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ शकते. तशी येऊ नये, म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं, तर आपल्याला त्यातून मार्ग काढणं सोयीचं आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
५ दिवसांत १० मंत्री, २० आमदार करोनाबाधित!
दरम्यान, अधिवेशन काळात अवघ्या ५ दिवसांत १० मंत्री आणि २० आमदार करोनाबाधित झाल्याचं अजित पवार म्हणाले. “कालच राज्य सरकारने करोनाच्या बाबतीत नवी नियमावली जाहीर केली आहे. करोना झपाट्याने वाढतोय. ५ दिवसांचच अधिवेशन आम्ही ठेवलं होतं. पण ५ दिवसांत १० मंत्र्यांना आणि २० पेक्षा जास्त आमदारांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.
“कृपा करून कुणी…”
“उत्साह प्रत्येकालाच असतो. प्रत्येकाला कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावेत असं वाटतं. पण नवीन आलेला करोना वेगाने पसरतो आहे. त्याची नोंद सर्वांनी घ्यावी. जगभरात अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशांमध्ये काही लाख रुग्ण रोज सापडत आहेत. दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. त्यामुळे कृपा करून नागरिकांनी सहकार्य करावं. आत्ताच का नियम कडक केले, असा आग्रह करू नये”, असं आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केलं.
“काही राज्यांनी जमावबंदीही केली आहे आणि काहींनी लॉकडाऊनही केलं आहे. राज्यात मुंबई आणि पुणे इथे रुग्णांची संख्या वाढते आहे. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना नियमांचं तारतम्य ठेवून प्रत्येकानं सहकार्य करावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे”, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.