गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पक्षातून बंडखोरी करून सरकारमध्ये सहभागी झालेल्या गटाचे प्रमुख अजित पवार यांचया भेटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवाय ही भेट एका व्यावसायिकाच्या घरी झाल्यामुळे त्यावरूनही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शरद पवारांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे मविआमध्येही संभ्रम निर्माण झाल्याचं सांगितलं जत असून त्यावरून ठाकरे गट व काँग्रेसने नाराजीही व्यक्त केली आहे. त्यावर आता खुद्द अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारमध्ये सामील झाल्यानंतर ५ जुलैच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर जाहीरपणे टीका केली होती. तसेच, त्यांना वयाचं कारण देत निवृत्तीचा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. चोरडिया नावाच्या उद्योगपतींच्या घरी ही भेट झाल्यानं तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यावर अजित पवारांनी ही कौटुंबिक भेटच होती, या भूमिकेचा पुनरुच्चार कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला आहे.

‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?

“पुण्याच्या बैठकीमुळे कोणताही संभ्रम नाही. शरद पवारांनी स्वत: सांगितलं की ते पवार कुटुंबातले ज्येष्ठ आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. घरातल्या व्यक्तीला भेटणं यात विनाकारण त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी दिली जात आहे. तिथे फार काही वेगळं घडलं असं समजण्याचं कारण नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“मी लपून का जाऊ? मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता”

दरम्यान, बैठकीला लपून गेल्याची चर्चा असल्याबाबत विचारणा केली असता अजित पवारांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. “मी तिथे भेटायला लपून गेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय गरज आहे लपून जायची? मी कुणाच्या घरी गेलो, तर मी तिथून कधी बाहेर निघायचं हा माझा अधिकार आहे. मी बैठकीला गेलो हे मान्य करतो ना मी”, असंही अजित पवार म्हणाले.

चोरडियांचंच घर का?

भेटीसाठी चोरडियांच्याच घराची निवड का केली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. “चोरडिया यांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत. चोरडियाचे वडील शरद पवारांचे वर्गमित्र होते. शरद पवार व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. माझा कार्यक्रम चांदणी चौकात होता. तो कार्यक्रम संपवून माझे पुढचे कार्यक्रम होते. चोरडियांनी शरद पवारांना जेवायला बोलवलं होतं. जयंत पाटील शरद पवारांबरोबर होते. कारण तेही त्या व्हीएसआयच्या कमिटीत आहेत. मीही व्हीएसआयला आहे. पण नितीन गडकरींनी चांदणी चौकातल्या एका कार्यक्रमाबाबत मला महिन्याभरापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे मला त्या मीटिंगला हजर राहायचं होतं. व्हीएसआयमध्ये मी सांगितलं की मी येऊ शकत नाही. त्यामुळे जर दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्यातून वेगळा अर्थ काढायचयं काहीच कारण नाही”, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

“जनतेला मी सांगेन की इथून पुढे आम्ही केव्हाही भेटलो तर त्यातून कोणताही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते”, असंही अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar clarifies on meeting with sharad pawar in pune pmw