राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील दणदणीत विजयानंतर भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळवू, असा विश्वास भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री म्हणून वानखेडे स्टेडियमवर कोण शपथ घेणार? असा प्रश्न विचारत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव वदवून घेतलं आहे. यावर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
भंडाऱ्यातील लाखनी येथे एका कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा बोलताना बावनकुळेंनी म्हटलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा विजयाचा एक-एक टप्पा पार करत आहे. तीन राज्यांत मिळालेल्या घवघवीत यशानं लोकसभेला आपण हॅट्रिक करणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.”
“आपल्याकडेही ( महाराष्ट्रात ) वेगळी परिस्थिती नसेल,” असं सांगताना पुढील मुख्यमंत्री म्हणून वानखेडे स्टेडियवर कोण शपथ घेणार? असा प्रश्न विचारत बावनकुळेंनी भाजपा कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचं नाव वदवून घेतलं.
हेही वाचा : तीन राज्यांमधील विजयानंतर राज्यातील भाजपचा अधिक जागांवर दावा ?
“लोकशाहीत भावनेला अर्थ नसतो”
यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे बावनकुळेंचा आत्मविश्वास वाढणं साहजिक आहे. पण, २०२४ साली अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अशी आमची भावना आहे. मात्र, लोकशाहीत भावनेला अर्थ नसतो. ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदावर दावा असतो.”
“झोकून देऊन काम करू”
“जास्तीत जास्त निवडून आणायचे आणि जसा बावनकुळेंचा संकल्प आहे, तसा आमचाही संकल्प आहे, की झोकून देऊन काम करू. २०२४ आणि २०२९ साली अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. तेही वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतील,” असा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे.