काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याचे पडसाद थेट विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडले. विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी केली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महामानवांबद्दलच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतला. ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) अहमदनगरमधील शिर्डी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “आपल्या सर्वांचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही सगळी महामानवं आपल्याकडे होऊन गेली. त्यांचा आदर्श ठेऊन आपण पुढे चाललो आहे.”

“महामानवांबद्दल कुणीही कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये”

“शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारापासून आम्ही यत्किंचितही बाजूला जात नाहीये. या राज्यात व देशात महामानवांचा आदर केलाच गेला पाहिजे. त्याबद्दल कुणीही कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये. याबद्दलची खबरदारी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी घेत आहेत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

“आजचा शासन आपल्या दारी कार्यक्रम अहिल्याबाई होळकरांच्या माहेरच्या मातीत”

“पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे आजचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरच्या मातीत होत आहे. याचा माझ्यासारख्याला मनापासून आनंद आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

“कलावंतांच्या उतारवयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं”

अजित पवार पुढे म्हणाले, “आज आम्ही महिलांनाही लाभ दिला. एका वयस्कर कलावंतालाही लाभ दिला. कोणताही कलाकार असला की त्याच्या अंगात ती कला असतेच. त्या प्रत्येकाचा काळ असतो. त्या काळातच ती कला प्रेक्षकांच्या समोर सादर करण्याचं काम राज्यातील कलावंत करतात. परंतु त्यांच्या उतारवयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं.”

हेही वाचा : अजित पवारांनी तुम्हाला कृषीमंत्रीपद, सुप्रिया सुळेंना केंद्रात, जयंत पाटलांना राज्यात मंत्रीपदाची ऑफर दिली का? शरद पवार म्हणाले…

“कधीकधी कलावंतांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही”

“कधीकधी तर त्या कलावंतांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही. त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, जागृक आहे. त्यासाठी आज आपण कोट्यावधी रुपये खर्च करत आहोत,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on controversial statement on freedom fighter pbs