राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकासआघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचं असतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. यातून त्यांनी प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीवरही भाष्य केलं. तसेच जिथं पाणी आहे आणि पोहचणं शक्य नाही तिथं ड्रोनने पाहणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “आघाडी सरकार चालवत असताना निर्णय झाल्यावर नेहमी समाधानी राहायचं असतं. त्यात पुन्हा एकदा वेगळं वक्तव्य करुन कारण नसताना गैरसमज पसरायचे नसतात, असं माझं मत आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वजण आपली भूमिका प्रकर्षाने मांडत असतात. परंतू निर्णय घेतला की त्या निर्णयाचं समर्थनच आम्ही करत असतो. त्यामुळे हा त्रिसदस्यीय प्रभाग रचना निर्णय आता महाविकासआघाडी सरकारचा निर्णय झालाय. आता त्याची अंमलबजावणी राज्यात होईल.

“लगेच काही आकाशपाताळ कोसळलं आहे असं समजण्याचं कारण नाही”

“काँग्रेसच्या प्रांताध्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. काँग्रेसच्या वतीने विधीमंडळात बाळासाहेब थोरात नेते आहेत. कॅबिनेटला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व इतर मान्यवर देखील होते. आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि इतरजण होते. त्यामुळे याबाबत लगेच काही आकाशपाताळ कोसळलं आहे असं समजण्याचं कारण नाही,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

“शहरातील परिस्थिती कोणत्या पक्षाला अनुकुल यानुसार भूमिका ठरतात”

अजित पवार यांनी प्रभाग रचनेतील मतमतांतरांबाबत आपलं निरीक्षणही मांडलं. ते म्हणाले, “प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. काही शहरांची परिस्थिती कुठल्या पक्षांना अनुकुल असते तेथे त्यांनी चार किंवा तीन प्रभाग असावे असं वाटतं. जिथं परिस्थिती अनुकुल नसते तिथं दोन किंवा एक प्रभाग असावा असं वाटतं. त्यानुसार मतं व्यक्त केली जातात. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. त्यांनी घेतलेला निर्णय सर्वजण मान्य करतात.”

जिथं पाणी आहे तिथं ड्रोनने पाहणी करण्याचे निर्देश

पुरस्थितीवर बोलताना अजित पवार म्हणाले, “पूरपरिस्थितीचा काल आढावा घेतला आहे. पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांना कसे मिळवून देता येईल याबाबत संबंधित लोकांशी बोललो. नुकसानबाबत संपूर्ण माहिती आल्याशिवाय निर्णय घेणार नाही. वेगवेगळे पालकमंत्री दौऱ्यावर आहेत, मी आणि मुख्यमंत्री जिल्ह्यात बसून निर्णय घेऊ. जिथं पाणी आहे तिथं ड्रोनने पाहणी केली तरी चालेल असं मी महसूल आयुक्तांना सांगितलं आहे.”

“सर्व राज्यं देशात आहे हे लक्षात घेऊनच केंद्राने मदत करावी”

“एसडीआरएफचा निधी केंद्र सरकार देतं. त्यांनी जर या निधीतून मदत करण्यास सर्व राज्यांना सांगितलं असेल तर त्यांनी निधी पाठवावा, आमची निधी वाटपाला हरकत नाही. केंद्र सरकारकडून विविध राज्यांना वेगवेगळी मदत होते. यामध्ये केंद्र सरकारचा दुजाभाव दिसून आलेला आहे. एका राज्याला एक वागणूक आणि इतर राज्यांना दुसरी वागणूक हे योग्य नाही. सर्व राज्य देशात आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी मदत करावी,” असा सल्ला अजित पवारांनी केंद्राला दिला.

“… तर लवकरच राज्यातील निर्बंध कमी होतील”

“आजपर्यंत सुरू न केलेल्या बाबी अंदाज घेत सुरू केल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही तसा मनोदय आहे. कोरोनाची संख्या अशीच कमी होत गेली तर लवकरच निर्बंध कमी होतील,” असंही पवारांनी नमूद केलं. तसेच परमबीर सिंहांवर प्रश्न विचारला असता ते कुठं आहेत हे राज्य सरकारला माहीत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

“अजितदादा आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on differences in mva over multimember ward decision pbs