निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. शिंदे गटाची शिवसेना तसेच भाजपाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक आयोग गुलाम असल्याचे म्हणत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट टीका केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत मनसे पक्षाचे उदाहरण देऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
…नंतरच निवडणूक आयोगाने निर्णय द्यायला हवा होता
“निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच निवडणूक चिन्हाबाबतचा दिलेला निर्णय पक्षपाती आहे. तशी जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निर्णय दिल्यानंतरच निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यायला हवा होता. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत,” असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >>> Manish Sisodia Arrested : मोठी बातमी! मनिष सिसोदियांना सीबीआयकडून अटक, ९ तासांच्या चौकशीनंतर कारवाई
मनसेचा एक आमदार आहे….
निवडणूक आयोग म्हणतो की ४० आमदार आणि काही खासदार शिंदे गटाकडे गेले म्हणून आम्ही पक्षनाव तसेच चिन्ह शिंदे गटाला दिले. मात्र एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील तर काय निर्णय देणार? मनसेचे उदाहरण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. या एका आमदाराने उद्या मनसे पक्ष माझा, इंजिन हे निवडणूक चिन्हही माझेच, असा दावा केला तर तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला होता, तोच निर्णय देणार का?” असा सवाल अजित पवार यांनी केला.