राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “गर्दी जमवण्यासाठी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,” असं म्हणत अजित पवारांनी हल्लाबोल केला. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) विधानभवनातील वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “८ सप्टेंबर २०२२ ला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी खुशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १२ सप्टेंबरच्या पैठण मतदारसंघातील सभेला प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, ४२ गावांमधील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशी पद्धत कधीच नव्हती.”
“राजकीय सभेला सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही”
“ही एकनाथ शिंदेंची राजकीय सभा असेल तर अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस सभेला गेल्या तर तेथील मुलांनी काय करायचं, ते कुठे जाणार? त्या मुलांकडे लक्ष कोण देणार? गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
अजित पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनावर बोलताना म्हणाले, “राष्ट्रादी काँग्रेसचं दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रविवारी (११ सप्टेंबर) दिल्लीत पार पडलं. एक विस्तारीत कार्यकारणी होती त्याची बैठक शनिवारी (१० सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली आणि रात्री नऊ ते १० वाजेपर्यंत चालली. नंतर खुलं अधिवेशन होतं, ते रविवारी १० दुपारी तीन वाजेपर्यंत होतं. त्या पद्धतीने ते झालं.”
“माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला”
“या अधिवेशनात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची पुढील धोरणं आणि पुढील वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांनी राज्याची भूमिका मांडली. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते आणि प्रांताध्यक्ष बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे मी तेथे बोलणं टाळलं. परंतु माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
“अधिवेशनात बोलू नका असं मला कुणीही सांगितलं नव्हतं”
ते म्हणाले, “वास्तविक राष्ट्रीय अधिवेशनात बोलू नका असं मला कुणीही सांगितलं नव्हतं. मीच माझी भूमिका घेतली. मी एकटाच बोललो नाही असं नाही. तसं बघितलं तर सुनिल तटकरे वेळेअभावी बोलू शकले नाही. त्याचबरोबर वंदना चव्हाण यांचंही नाव होतं. त्याही वेळेअभावी बोलू शकल्या नाहीत. याशिवाय आणखी दोन तीन राज्यांचे प्रतिनिधी तेथे आले होते, तेही बोलू शकले नाही.”
हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्याच नावावर…” अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अजित पवारांचं विधान
“मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”
“मी नंतर मराठी माध्यमांशी चर्चा केली. त्यांना साधारण काय झालं ते सांगितलं. मी मध्ये वॉशरुमला बाहेर गेलो, तरी अजित पवार बाहेर केले म्हणून कारण नसताना चर्चा करण्यात आली. मी वॉशरुमलाही बाहेर जायचं नाही का? मला काही कळत नाही. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तुस्थितीवर आधारित बातम्या देण्याची जबाबदारी माध्यमांवर आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.