राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये अनेकदा शाब्दिक युद्ध झालं. मात्र, शुक्रवारी (१४ जुलै) अजित पवार रात्री अचानक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हरओक बंगल्यावर गेले. यानंतर या भेटीची जोरदार चर्चा झाली. शनिवारी (१५ जुलै) नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांनी अजित पवारांना या भेटीबाबत विचारलं. त्यावर त्यांनी या भेटीमागील कारण सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “काकींचं शुक्रवारी (१५ जुलै) एक ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. मला दुपारीच ऑपरेशन झाल्या झाल्या त्यांना भेटायला जायचं होतं. मात्र, उशीर झाला. कारण खातेवाटप जाहीर झालं, मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो, अधिवेशन सोमवारपासून असल्याने विधानसभा अध्यक्षांनाही भेटायचं होतं.”

“मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही…”

“माझं काम संपवल्यावर मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही आता सिल्व्हर ओककडे निघालो आहोत. तू तुझं काम झाल्यावर सिल्व्हर ओकलाच ये. मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शेवटी वर्षानुवर्षांचं नातं आहे. आपण परिवाराला महत्त्व देतो ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळे साहजिकच मी गेलो,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : अर्थखातं मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न, आता काय? अजित पवार म्हणाले…

“माझ्या अंतर्मनाने सांगितलं तिथं गेलं पाहिजे”

“आमच्या आजीआजोबांनी आम्हा पवार कुटुंबियांना ही परंपरा शिकवली आहे. त्यानंतरच्या काळात आई-वडील, काका-काकी यांनी शिकवली. म्हणून मी काकींना भेटायला गेलो होतो. मी अर्धा तास तिथं होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली, खुशाली विचारली. त्यांना २१ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं की, तिथं गेलं पाहिजे आणि मी तिथं गेलो,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on his visit to silver oak pratibha sharad pawar pbs
Show comments