राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. मात्र हा प्रयोग फसला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या याच सकाळच्या शपथविधीसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा शरद पवार यांच्या राजकीय खेळीचा एक भाग असू शकतो, असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. याच शपथविधीवर आता विद्यामान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. एका माध्यमाने आयोजित केलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा >> शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सांगितले होते, पण…”
मी शपथ घेतल्यानंतर…
महाविकास आघाडी सरकार कोसळळ्यानंतर आपण जे अगोदर केले होते (पहाटेचा शपथविधी) तेच योग्य होते, असे वाटले होते का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. याला उत्तर म्हणून “मी शपथ घेतल्यानंतर वेगळे चित्र निर्माण झाले होते. तेव्हाच मी सांगितले होते की, मी तेव्हा जे केले होते, त्याबद्दल मी कधीही कुठलेही वक्तव्य करणार नाही. त्यामुळे मी आताही यावर काहीही बोलणार नाही. मला त्या विषयाच्या खोलात जायचे नाही,” असे अजित पवार म्हणाले.
भल्या सकाळी शपथविधी झाला म्हणणे योग्य नाही
“त्या गोष्टीला तीन वर्षे झाली आहेत. झालं गेलं गंगेला मिळालं. आता नवी सुरुवात झाली आहे. आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडत आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी आम्हाला चार जागा जिंकता आल्या. लोकांनी जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला कसा तडा जाणार नाही, याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सारखं भल्या सकाळी, भल्या सकाळी म्हणणे योग्य नाही. सकाळची आठ वाजेची वेळ ही भली सकाळ नसते. आम्ही सकाळी सहा वाजता कामाला लागतो,” असेही अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >> “सत्यजीतसाठी शरद पवारांनी खरगे यांना फोन केला होता, पण…”, अजित पवारांचा मोठा खुलासा
उद्धव ठाकरे यांना सांगितले होते पण…
दरम्यान, त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले. बंडखोरीच्या सहा महिन्यांपूर्वीच माझ्या कानावर कुजबूज आली होती. त्याबाबत मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. ‘माझ्याही कानावर ते आले आहे. मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून घेतो. आमचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्यातून मार्ग कढतो,’ असे त्यांनी मला सांगितले,” असा खुलासाही अजित पवार यांनी केला.