Ajit Pawar on Rohit Pawar : आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. राज्यात नवं सरकार आल्यानंतरचं हे दुसरं अधिवेशन असलं तरीही राज्याला अद्यापही विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या बाहेर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून लांब राहिलेले अनेक नेतेही माध्यमांशी संवाद साधत होते. पहिल्याच दिवशी फारसा गदारोळ झालेला नसला तरीही अनेक छोट्या मोठ्या घडामोडींमुळे आजचा दिवस चर्चेत राहिला. तसंच, रोहित पवार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मागून अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. ही मिश्किल टिप्पणीही अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रोहित पवार आज अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेत दाखल झाले होते. त्यामुळे टीव्ही ९ मराठीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संवाद साधत असतानाच मागून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येत होते. त्यांनी रोहित पवारांना पाहताच “झिपऱ्या बऱ्याच वाढल्या तुझ्या”, अशी मिश्किल टिप्पणी केली. या टिप्पणीवर रोहित पवारांनीही त्यांच्याकडे मागे वळत हसून पाहिलं. काका-पुतण्याच्या नात्यातील गंमतशीर पैलू आज यानिमित्ताने विधानभवनात पाहायला मिळाला.

आज अधिवेशनात काय झालं?

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घरं, कृषी पंपांना वीजेच्या दरात सवलत व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. तसेच राज्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद जाहीर करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्याच्या कानाकोपऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला बळकटी देण्यासाठी यंदा एकूण ६,४८६.२० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी निव्वळ भार ४,२४५.९४ कोटी रुपये इतकाच आहे”.

रोहित पवार पक्षात नाराज?

तुमच्या पक्षाची एक महत्वाची बैठक झाली, त्या बैठकीत अनेकांना वेगवेगळ्या पदाचं वाटप करण्यात आलं. पण जे रोहित पवार निवडणुकीत मैदानात उतरून लढाई लढत होते, ते यामध्ये कुठेही दिसत नाहीत? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी रोहित पवारांना विचारला, यावर बोलताना ते म्हणाले, “मी आजारी असल्यामुळे मला त्या बैठकीला जाता आलं नाही. त्यामुळे त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. मात्र, अजूनपर्यंत कुठलीही जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही. तसेच मला कोणती जबाबदारी दिलेली आहे हे मला कळालेलं नाही. मला जबाबदारी दिली नाही म्हणून मी नाराज आहे असा विषय नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

Story img Loader