शिवसेनेच्या शिंदे गटाने ज्या अजित पवारांवर गंभीर आरोप करत शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितलं आता त्यांच्याबरोबरच सरकारमध्ये काम करावं लागत आहे. अशातच खातेवाटपाआधी शिंदे गटाकडून अजित पवारांना अर्थमंत्रीपद देण्याला जोरदार विरोध झाला. तसेच ते पुन्हा अर्थमंत्री झाले, तर पुन्हा मागच्याप्रमाणे निधीवाटपात भेदभाव होईल, अशी शंका उपस्थित करण्यात आली. मात्र, इतक्या विरोधानंतरही राज्याचं अर्थखातं अजित पवारांकडेच आलं. याबाबत अजित पवारांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (१५ जुलै) नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “मला अर्थखातं देण्याला शिंदे गटाचा विरोध या सर्व बातम्या माध्यमांमध्ये होत्या. त्यातील काही बातम्या ‘टेबल न्यूज’ होत्या. एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं म्हटलं, तर मलाही कळतं की, महायुतीला पाठिंबा देणाऱ्या कुणाहीबाबत कटुता राहणार नाही, एकमेकांबद्दल समज-गैरसमज राहणार नाही असं काम करावं लागेल.”

“यात भेदभाव करण्याचं कोणतंही कारण नाही”

“शेवटी आम्ही जनतेच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, विकासासाठी काम करतो. यात भेदभाव करण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांची बैठक बोलावतील तेव्हा उपमुख्यमंत्री आणि मंत्री असे आम्ही सर्वजण हजर राहू. त्यावेळीही मी त्या सर्वांना विश्वास देईन,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

हेही वाचा : शरद पवार की अजित पवार? ‘या’ तटस्थ आमदाराकडून अखेर भूमिका स्पष्ट, म्हणाल्या…

“काम करतो तोच चुकतो”

“पाठिमागच्या काळात जर कुठं काही घडलं असेल, तर मी नेहमी सांगतो की, काम करतो तोच चुकतो. जो कामच करत नाही, तो बिनचूक असतो. त्यामुळे काही तक्रार असेल, त्या तक्रारीत काही तथ्य असेल, तर मी कुठलेही आढेवेढे न घेता त्यात लक्ष घालीन. तसेच परत तशाप्रकारची तक्रार राहणार नाही, याबाबत खबरदारी घेईन,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on shinde faction oppose him as finance minister pbs
Show comments