शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या पदवीच्या वैधतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांची पदवी बोगस असल्याचा दावा केला जात आहे. त्यांना पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून पदवी मिळालेली आहे. हे विद्यापीठ मागील बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. याच प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार, उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री होण्यासाठी नियमांचा विचार केला जावा. अनेक नेत्यांकडे उच्च शिक्षण नसतानाही त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच परीक्षेला न बसताही डिग्री घेणारे अनेक लोक आहेत, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. ते आज (२८ डिसेंबर) नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>>Flashback 2022: श्रद्धा वालकर, अंकिता सिंह ते अंकिता भंडारी, २०२२ सालातील निर्घृण खून ज्यामुळे संपूर्ण देश हादरला!
“आमदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्यासाठी संविधानाने सांगितल्यानुसार आपण नियमांमध्ये बसतो का हे पाहायचे असते. मागेही असेच आरोप-प्रत्यारोप झाले. ज्यांच्या शिक्षणसंस्था असतात त्यांना डॉक्टरेट खूप मिळतात. ज्या अर्थी एखाद्या व्यक्तीने संस्था काढलेली असेल, विद्यापीठ सुरू केलेले असेल त्या अर्थी ती व्यक्ती नक्कीच हुशार असते. याबाबत टीका करण्याचा मला अधिकार नाही. काही लोकांना चांगले काम केल्यामुळेही डॉक्टरेट मिळते. काही लोकांना पदवी असते मात्र ते स्वत: कधी परीक्षेलाच बसलेले नसतात. आता कोण कशात मोडतं हे सांगण्यासाठी मी लक्ष घातले पाहिजे असे नाही,” असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >>> चीनमधील करोना उद्रेक कशामुळे? कोविड पॅनेलचे प्रमुख अरोरा यांनी सांगितलं, म्हणाले “तेथे चार…”
“मात्र ज्या व्यक्तीने जे शिक्षण घेतलेले आहे, त्या व्यक्तीने तसा अर्ज भरून द्यावा. यामध्ये कमीपणा वाटण्याचे कारण नाही. कमी शिकलेल्या लोकांकडून चांगले काम केल्याची अनेक उदाहरणे आपल्यापुढे आहेत. आपल्यासमोर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे एक चांगले उदाहरण आहे. ते इयत्ता चौथी शिकलेले होते. मात्र ते चार-चार वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. त्यांची प्रशासनावर पकड होती,” असे उदाहरण अजित पवार यांनी दिले.
हेही वाचा >>> अधिवेशन सोडून अजित पवारांचा मुंबईला जाण्याचा निर्णय, एकनाथ शिंदेंकडून विशेष विमानाची सोय; नेमकं कारण काय?
“आम्ही उदय सामंत यांना राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष केले होते. आम्ही त्यांना आमदारकीचे तिकीट दिले. नंतर त्यांच्या मनात काय आले माहिती नाही पण ते शिवसेनेत गेले होते. नंतर ते शिंदे गटात गेले. शेवटी कोणाला कोठे जायचे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे,” असेही अजित पवार म्हणाले.