काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील सिंचन घोटाळयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. पोलीस त्यांच्या आणि अन्य आरोपींच्या दारात केव्हाही पोहोचू शकतात असे विधान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
निगडीत भाजपाच्या अटल संकल्प संमेलनात बोलताना त्यांनी हे विधान केले. २०१४ पूर्वी सत्तेत येण्याआधी भाजपाने सिंचन घोटाळयावरुन राज्यात रान उठवले होते. अजित पवारांवर भाजपाकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.
पण सत्ता आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासात म्हणावी तशी प्रगती दिसली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर रावसाहेब दानवे यांनी थेट अजित पवारांना अटक होऊ शकते असे विधान केले आहे.
निवडणुका आल्या की राम आठवतो – अजित पवार<br />अजित पवारही आज पिंपरीत आले होते. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो अशी टीका त्यांनी केली.
निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला ५९ मिनिटात एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का? निवडणुकीसाठी हे सर्व सुरु आहे. सत्तेत आल्यावर म्हणणार हा चुनावी जुमला होता. सरकारने नुसता दुष्काळ जाहीर केला. काहीच नियोजन नाही. भाजप सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.