महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच विरोधकांनी हे सरकार पडणार, असं भाष्य करायला सुरूवात केली. त्या दिशेने प्रयत्नही करत असल्याचं उघड केलं. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाचे नेते आनंद साजरा करत आहेत, मात्र विरोधक हे सरकार लवकरच पडणार याच मुद्द्यावर ठाम आहेत. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विरोधकांना टोला लगावला. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.
यावेळी सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “काहींनी सरकार चालणार की नाही? यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. देव पाण्यात बुडवले होते. मात्र सरकार काम करत आहे. आम्ही शपथ घेतल्यानंतर करोना आला. अनेक जवळचे लोक गेले. आणखी एक नवीन विषाणू आला आहे. मी काल आढावा घेतला. आज मुख्यमंत्री घेत आहेत. आई बापाच्या पोटी एकदाच जन्माला येतो. त्यामुळे काळजी घ्यायला हवी. करोना प्रतिबंधक लस घ्या. विकासकामे झाले नाही तरी आरोग्यासाठी सरकार म्हणून आम्ही कमी पडणार नाहीत. आम्ही केंद्राशी बोलत आहोत. एका जोडप्यामुळे राज्यात किती लाख लोकांना करोना झाला. त्यामुळे बंधन असावे”.
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या कळवण तालुक्यातील विविध विकासकामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच शेतकरी, आदिवासी मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ हे देखील उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान भाषण करताना अजित पवार यांनी राज्यातील सध्याच्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. अजित पवार यांनी नाशिककरांना विकास कामांसाठी निधीत कमी पडू देणार नाही, असंही आश्वासन दिलं. “तुम्ही आमची भावकी निवडून दिली आहे. त्यामुळे तिजोरी माझ्याकडे आहे. आमदार नितीन पवार यांना काहीही कमी पडू देणार नाही”, अशी ग्वाही अजित पवार यांनी नाशिककरांना दिली.