न्यायालयाने परराज्यातून गोमांस आयात करण्याला परवानगी दिली असेल तर राज्यात गोमांस बंदी कशासाठी असावी, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते. गोमांस बंदीचा निर्णय हा शेतकरी विरोधी आहे. सध्याच्या घडीला राज्यात भीषण दुष्काळ आहे. अशावेळी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. सरकारही त्यांची जबाबदारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे भाकड बैल विकून चार पैसे खिशात येण्याची शक्यताही पार मावळून गेली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार सध्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी ते मराठवाड्यात आहेत.
गोमांस बाळगणे गुन्हा नाही
उच्च न्यायालयानेही गोवंशाचे मांस परराज्यातून आणण्यास आणि खाण्यास परवानगी दिली आहे. जर परराज्यातून आणलेले बीफ खायला परवानगी असेल तर सरकारच्या गोवंश हत्या बंदीला कुठलाही अर्थ उरत नाही, असे पवार यांनी सांगितले. गोमांसाच्या व्यवसायावर राज्यातील एक कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे. तसेच चिकन, मटण महाग असल्याने जे लोक गोमांस खातात किंवा त्यातून जी प्रथिने मिळतात त्यावरही गदा आली आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

 

Story img Loader