राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्या आपल्या नेत्यांना भरसभेत सुनावलं. “अरे, राष्ट्रवादीचे नेतेच राष्ट्रवादी संपली म्हणत असतील, तर या कार्यकर्त्यांनी कुठं बघायचं?” असा सवाल अजित पवारांनी विचारला. तसेच कधीही कुठलाही पक्ष संपत नसतो, असा सल्लाही दिला. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये एस. पी. साखर कारखान्याच्या गळीत हंगाम उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “मघाशी सुरेशरावांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस संपली. अरे, राष्ट्रवादीचे नेतेच राष्ट्रवादी संपली म्हणत असतील, तर या कार्यकर्त्यांनी कुठं बघायचं? कधीही कुठलाही पक्ष संपत नसतो. एकेकाळी भाजपाचे अख्ख्या देशातून दोन खासदार निवडून आले होते. ते डगमगले नाही, खचले नाही, ना उमेद झाले नाही. दोन तर दोन तिथून सुरुवात करू म्हणत त्यांनी काम केलं आणि आता दोन पंचवार्षिकला ते बहुमताने निवडून आलेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.
“कुठेच कुणाची मक्तेदारी नसते. लोकं कोणाचं नेतृत्व चांगलं आहे, कुणाचे विचार चांगले आहेत, कुणाची कामाची पद्धत चांगली आहे, हे पाहतात,” असंही पवारांनी नमूद केलं.
“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”
अजित पवारांनी त्यांच्या निवडणुकीतील विजयाचं रहस्य सांगितलं. ते म्हणाले, “खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये जे राजकारण करायचं ते आपण करू. आपआपल्या पक्षांची ध्येयधोरणं मांडू. लोकांना ज्यांचं पटेल त्यांच्या मागे लोकं उभे राहतील, पण संस्था चालवताना हा जवळचा, हा लांबचा असं करायचं नाही. हा आपल्या पक्षाचा म्हणून त्याचा ऊस आधी आणायचा, विरोधकाचा म्हणून त्याचा ऊस उशिरा हा भेदभाव माझ्या तरी भागात मी करत नाही.”
“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”
“माझी विनंती आहे की, शेवटी सर्व शेतकरी समाज आपला आहे. कुणीच कुणाचा कायमचा बांधिल नसतो. आपण चांगलं काम केलं, लोकांना विश्वास दिला, तर लोक आपल्या मागे उभे राहतात. बाबांनो मी सातवेळी बारामती मतदारसंघातून निवडून आलो. यावेळी मी एक लाख ६५ हजार मताधिक्याने निवडून आलो. सर्व विरोधी उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. का झाली? कारण, मी तिथं भेदभावच करत नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “उसाच्या २६५ बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…
“तेच लाजंकाजं म्हणतं मतदान न करताही यानं काम केलं”
अजित पवार पुढे म्हणाले, “एखाद्याने निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलं आणि मी निवडून आलो तरी त्यांची कामं करतो. मी निवडून आल्यावर संपूर्ण मतदारसंघाचा आमदार होतो. त्यावेळी मी विरोधी काम करणाऱ्यांचंही काम करण्याचा प्रयत्न करतो. तेच लाजंकाजं म्हणतं मतदान न करताही यानं काम केलं, पुढच्यावेळी यालाच मतदान करायचं. माझं काम असं असतं. तशी इथं पद्धत नाही.”