महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या भोंग्यांच्या राजकारणावर सडकून टीका केली. तसेच जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते, परंतू आता हे सर्व दुरावल्याचं सांगत टोला लगावला. यावेळी अजित पवार यांनी मशिदीवरील भोंगे हटवल्यास उद्या शिर्डीतील साईबाबा मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता भोंग्यावर होणारी काकड आरतीही बंद ठेवावी लागेल, असा इशारा दिला. अजित पवार सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायतीचा वर्धापनदिन आणि शेतकरी मेळाव्याला आले असताना बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत आणि वर्षातून १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत भोंगे वाजविण्याची परवानगी आहे. मशिदीवरील भोंगे हटविल्यास उद्या शिर्डीतील साईबाबा मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता भोंग्यावर होणारी काकडारतीही बंद ठेवावी लागेल.”

“कीर्तन, प्रवचन सप्ताहासह वाघ्यामुरळीचे कार्यक्रमही बंद करावे लागतील”

“अनेक मंदिरे, मठांमध्ये भोंगे लावून रात्री उशिरापर्यंत कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम होतात. गावात एकमेकांच्या संमतीने, कोणालाही त्रास होऊ न देता भोंग्यांचा वापर करून होणारे असे कीर्तन, प्रवचन सप्ताहासह वाघ्यामुरळीचे कार्यक्रमही बंद करावे लागतील. त्याचा विचार करता हे चाललेले भोंग्याचे राजकारण फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे ठरेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

“करोना संकटातून बाहेर पडत असताना भोंग्याचं राजकारण”

अजित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांच्या भोंग्यांच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “करोना महामारीमुळे दोन वर्षे संकटात गेली. अनेक जीवाभावाची माणसे गेली, घरे उजाडली, उद्योग व्यवसाय धोक्यात आले. रोजगार बुडाला, अशा संकटातून बाहेर पडत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची पावले पडत असतानाच अचानकपणे भोंग्याचे राजकारण केलं जातंय.”

“जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते, परंतु…”

यातून सामाजिक व धार्मिक सलोखा, एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. या माध्यमातून जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते. नाशिक महापालिका ताब्यात होती. परंतु हे सारे दुरावले आहे.

“राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न”

“मागील दोन वर्षे करोना महामारीचे संकट सोसल्यानंतर त्यातून बाहेर पडत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं असताना काहीजण अचानकपणे भोंग्याचे राजकारण करून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न जनतेने हाणून पाडावा,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

“मोदी सरकारविरोधात राज्यभर सभा घेणाऱ्यांनी आता उलटी प्लेट लावली”

अजित पवार पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात राज्यभर प्रचारसभा घेणाऱ्यांनी आता उलटी प्लेट लावली आहे. आज कोणत्याही निवडणुका नाहीत. सर्व सण, उत्सव शांततेने आणि उत्साहाने साजरे होत असताना मधूनच भोंग्याचे राजकारण करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. त्यांच्या राजकारणाला जनतेने बळी पडू नये.”

हेही वाचा : “महाराष्ट्रात चुकीची भाषा चालू देणार नाही”, अजित पवारांच्या इशाऱ्यावर मनसेच्या सरदेसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दुपारच्या रणरणत्या उन्हात हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांच्या साक्षीने झालेल्या या मेळाव्यास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदींची उपस्थिती होती.