राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत,” असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे”, असा टोलाही लगावला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही मार्गदर्शन केलं.
अजित पवार म्हणाले, “सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यातून लाखो नोकर्या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत. मात्र, सरकार याचे लंगडे समर्थन करताना दिसत आहे. चार लाख कोटी एवढी गुंतवणूक राज्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र, आता महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प गेला हे धांदात खोटं बोलत आहेत.”
“अंगलट आल्यावर दिल्लीला जातो आणि प्रकल्प घेऊन येतो सांगतात”
“अंगलट आल्यावर दिल्लीला जातो आणि प्रकल्प घेऊन येतो सांगत आहेत. मात्र, यांच्यामुळेच बेकारी वाढत आहे. नोकर्यांवर गंडांतर येत आहे. हे सरकार जनतेची पूर्णपणे फसवणूक करत आहेत. सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे,” अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली.
हेही वाचा : “जाऊ द्या, जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”, अजित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला!
“यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा अधिकार नाही”
“महाराष्ट्राचे प्रकल्प बाहेर जात आहेत. यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रातून प्रकल्प गेले हे शिंदे सरकारचे अपयश आहे. हे सरकार जितका काळ सत्तेत राहिल तितकी बेकारी, बेरोजगारी राज्यात वाढणार आहे,” असंही अजित पवार म्हणाले.