Sunil Tatkare on Jayant Patil: करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम या निवडणुकीत नक्कीच होणार, अशी प्रितिक्रिया राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. घडाळ्याच्या चिन्हाचे पाटील यांना भय का वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत स्ट्राईक रेट जास्त असल्यामुळे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालोच आहोत, अशी दिवास्वप्न पडायला लागले त्यांना घड्याळाची भीती वाटणे स्वाभाविक आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. सुनील तटकरे पुढे म्हणाले, जयंत पाटील आतल्या गाठीचे आहेत. त्यांच्या मनात एक आणि ओठावर एक असतं. राष्ट्रवादीचे घड्याळच चालणार हे त्यांच्या मनात आहे.
अन् निघाले राज्याचे नेतृत्व करायला
फक्त सुनील तटकरेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. सांगली येथील सभेत त्यांनी जयंत पाटील यांची नक्कल करत त्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, कासेगावमध्ये भाड्याच्या घरात पोलीस ठाणे सुरू आहे. स्वतःच्या गावात यांना पोलीस ठाणे बांधता येत नाही आणि राज्याचे नेतृत्व करायला निघाले आहेत. राज्यात काय सगळीकडे भाड्याची पोलीस ठाणे उभारणार आहेत का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करताना जयंत पाटील यांची नक्कल केली.
अमित शाहांच्या विधानावर स्पष्टीकरण
अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे विधान केले, त्याबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, प्रत्येक पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. अमित शाह महायुतीचे नेते आहेत. अमित शाह यांनी काल भाषणात महायुतीच्या विजयाचा संकल्प केला. तसेच हे करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पाठी ताकद उभी करा, असे म्हटले. त्यामुळे यातून वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. निवडणुकीनंतर महायुती एकत्र बसून निर्णय घेईल.
© IE Online Media Services (P) Ltd