राज्याचे उपमुख्यंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिला आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. तसेच त्यांनी राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांबाबतही माहिती दिली. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोलाही लगावला.
अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. हे सांगताना त्यांनी जयंत पाटील यांनाही लक्ष्य केलं. आतापर्यंत १०८ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आली असून जयंत पाटील साहेब, आपल्या वेळी प्रकरण पुढे जायचंच नाही, असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना, येत्या दोन वर्षांत ६१ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून त्यातून ३ लाख ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी जलयुक्त शिवार अभियान २ अंतर्गत मार्च २०२४ अखेर ४९ हजार ६५१ कामं पूर्ण झाली असून यावर्षी ६५० कोटींच्या निधीची तरदूद करण्यात आली आहे, असंही सांगितलं. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेतून ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना असे पंप उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.
हेही वाचा – प्रत्येक वर्षाला तीन सिलिंडर मोफत; अर्थसंकल्पात अजित पवारांकडून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ची घोषणा!
याशिवाय संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून आर्थिक दुर्बल घटकांतील निराधार, विधवा व दिव्यांग वृद्ध नागरिकांना दरमहा सहाय्य करण्यात येते. यात १ हजार रुपयांवरून दीड हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणाही अजित पवार यांनी केली. तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे, असेही त्यांनी जाहीर केलं.